Nashik News : खंडणी प्रकरणात महिलेच्या भावाचाही सहभाग, पोलिसांकडून अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या विश्वस्तास धमकावून दहा लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या माय-लेकास न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि.२२) पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या सखोल तपासात खंडणी मागणाऱ्या महिलेच्या भावाचाही या गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

विनोद सयाजी चव्हाण (४१, रा. देवळा) असे अटक केलेल्या तिसऱ्या संशयिताचे नाव आहे. या आधी पोलिसांनी सारिका बापूराव सोनवणे (४२) व मोहित बापूराव सोनवणे (२४, दोघे रा. पाथर्डी फाटा) यांना अटक केली आहे. तिघांनाही २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी सारिका यांच्या घरातून १९ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ न्यासाच्या विश्वत मंडळाचे सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (५४, मूळ रा. देवळा) यांच्या फिर्यादीनुसार, कृषी सहायक अधिकारी असलेल्या संशयित सारिका बापूराव सोनवणे (रा. पाथर्डी फाटा) या सिडकोसह कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा परिसरातील ४५ समर्थ केंद्रांची जबाबदारी सांभाळत होत्या. काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर शिरसाट यांनी सोनवणे यांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत केली. त्यानंतर सारिका यांनी विविध कारणे देत २५ लाख रुपये उसनवार घेतले. जानेवारी २०२२ मध्ये सारिका व मोहित सोनवणे यांनी शिरसाट यांना गंगापूर रोड येथे बोलावून घेत तुमचे मॉर्फ व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच शिरसाट यांना आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून २० कोटी रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून शिरसाट यांनी सारिकास नोव्हेंबर २०२३ मध्ये ५० लाख रुपये दिले. मात्र, सारिकाने पुन्हा साडेदहा कोटी रुपये मागितले. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने शिरसाट यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून मोहित सोनवणे यास शनिवारी (दि.१८) जेहान सर्कल येथे १० लाख रुपयांची खंडणी घेताना पकडले. दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. संशयितांच्या घरातून १९ लाख रुपयांची रोकड जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच सखोल तपासात शिरसाट यांच्याकडे खंडणी मागताना, आर्थिक व्यवहार करताना विनोदचा सहभाग होता. तसेच खंडणीतील ५० लाख रुपयांमधील काही पैसे विनोदकडे असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी विनोदलाही अटक केली आहे. त्याच्याकडून इतर माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. तसेच त्याच्याकडून रोकडही हस्तगत केली जात आहे.

मोहित विज्ञान शाखेचा पदवीधर

सारिकाने तिचा मुलगा मोहित हा आयटी तज्ञ असल्याचे सांगून शिरसाट यांना घाबरवले होते. मात्र, पोलिस तपासात मोहितने विज्ञान शाखेची पदवी घेतल्याचे उघडकीस आले आहे.

सारिका यांच्यावर होणार निलंबनाची कारवाई

सारिका या निफाड येथे कृषी सहायक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या ४ ऑक्टोबरपासून वैद्यकीय रजेवर आहेत. दरम्यान, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने व पोलिस कोठडीत असल्याने वरिष्ठांनी याबाबत अहवाल मागवला आहे. तसेच त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित होणार असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी यांनी दिली.

व्हिडिओची सत्यता पडताळणार

संशयित सारिका व मोहित सोनवणे यांनी शिरसाट यांना व्हिडिओच्या आधारे धमकावले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी तपासणी सुरू केली आहे. जप्त मोबाइल व लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

The post Nashik News : खंडणी प्रकरणात महिलेच्या भावाचाही सहभाग, पोलिसांकडून अटक appeared first on पुढारी.