Nashik News : पालकमंत्री शुक्रवारी घेणार पीकविम्याचा आढावा

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यातील पीकविम्यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे हे शुक्रवारी (दि.२२) आढावा घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजता ही बैठक हाेणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या आदेशानुसार ओरिएन्टल पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना २५ टक्के मदतीनुसार आतापर्यंत ६० कोटी रुपयांचे वितरण केले आहे.

चालू वर्षी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. बहुतांश तालुक्यांत सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने रब्बी हंगामालाही फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अल्प पर्जन्यमान असलेल्या ५५ महसुली मंडळांमधील शेतकऱ्यांसाठी पीकवीमा योजनेअंतर्गत २५ टक्क्यांची मदत पहिल्या टप्प्यात मंजूर झाली आहे. ही रक्कम १०५ कोटी रुपयांची आहे. मंजूर रकमेपैकी ६० कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पाच लाख ८६ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. खरीप हंगामातील सोयाबिन, मका, बाजरी, कपाशी, मूग, भुईमूग, तूर व भाताचे ५० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचा कृषी विभाग व पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या बँकखात्यात पीकविम्याची रक्कम जमा केली जात आहे.

२५ टक्के मदतीचे आदेश

शासनाच्या मार्गदर्शनानुसार सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट होणार असेल तर अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यायची आहे. २५ टक्के मर्यादेपर्यंत कापणी पूर्व ही मदत देण्याबाबत शासन आदेश आहे. तसेच शासनाने विमा कंपनीला ४०६ कोटी रुपये वर्ग केले होते. राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना ही मदत दिवाळीपूर्वी मिळणे अपेक्षित असताना अद्यापही शेवटच्या लाभार्थी शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचलेली नाही.

हेही वाचा :

The post Nashik News : पालकमंत्री शुक्रवारी घेणार पीकविम्याचा आढावा appeared first on पुढारी.