नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी तब्बल २८ वर्षांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन मंगळवारी (दि.२३) नाशिकमध्ये होत आहे. या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज (दि.२२) नाशिकमध्ये दाखल होत असून, भगूर येथील स्वा. सावरकर यांच्या स्मारकाला ते भेट देणार आहेत. अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन व महापूजा करतील. त्यानंतर ठाकरे यांच्या हस्ते गोदा आरतीचा कार्यक्रम होणार आहे.
अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी खा. संजय राऊत हे शनिवार(दि.२०) पासून नाशकात तळ ठोकून आहेत. तर ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई, खा. विनायक राऊत, खा. अरविंद सावंत यांचे रविवारी नाशिकमध्ये आगमन झाले. आज (दि.२२) दुपारी ४ वाजता ठाकरे यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल. येथून ते भगूर येथील स्वा. सावकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता ठाकरे हे पंचवटीतील श्री काळारामाचे दर्शन घेतील. याठिकाणी त्यांच्या हस्ते महापूजा केली जाईल. यानंतर सायंकाळी ७ वाजता अयोध्येतील शरयु नदीच्या धर्तीवर नाशिकमध्ये ठाकरे यांच्या हस्ते गोदा आरती केली जाईल. मंगळवारी, दि. २३ रोजी सकाळी १० वाजता सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे ठाकरे गटाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होणार आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात ठाकरे गटाच्या सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच राज्यभरातून सुमारे १७०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती खा. राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
अयोध्येतील रामलल्लाची प्रतिष्ठापना हा देशाच्या अस्मितेचा आणि श्रध्देचा विषय आहे. एका पक्षाकडून या सोहळ्याचे राजकारण केले जात असले तरी आम्ही पक्षीय राजकारण बाजुला सारून या सोहळ्यानिमित्त पुजा अर्चात सहभागी झालो आहोत. उध्दव ठाकरेंचे काळाराम दर्शन व महापुजा हा कार्यक्रम या सोहळ्याचाच एक भाग असल्याचे खा. राऊत म्हणाले.
नेत्यांकडून सभास्थळाची पाहणी
उध्दव ठाकरे यांचा दौरा आणि राज्यस्तरीय अधिवेशनाच्या नियोजनात ठाकरे गटाचे नेते आणि स्थानिक पदाधिकारी रविवारी दिवसभर व्यस्त होते. खा. संजय राऊत, सुनील देसाई, खा. विनायक राऊत, खा. अरविंद सावंत यांनी श्री काळाराम मंदिरातील दर्शन व महापूजचे नियोजन तसेच गोदाघाटाचा पाहणी दौरा करत माहिती घेतली. यानंतर अधिवेशनस्थळ असलेल्या हॉटेल डेमोक्रसी व जाहीर सभेचे ठिकाण असलेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची पाहणी करत सूचना दिल्या. यावेळी उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी गटनेते विलास शिंदे, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, विनायक पांडे, वसंत गिते आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
- क्लिकवर मिळणार भूमिअभिलेख : महाभूमी संकेतस्थळावरून अंमलबजावणी
- नव्या इतिहासाची नांदी!
- गोंदवलेतील श्रीराम मंदिरे
The post Nashik News I उध्दव ठाकरे आज श्री काळाराम दर्शनाला; राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.