Nashik NMC | गतवर्षीच्या तुलनेत महापालिकेच्या महसुलात २१ कोटींची वाढ

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- १ एप्रिल ते ३१ मे या दरम्यान तब्बल दोन लाख ५ हजार ५०४ मिळकतधारकांनी महापालिकेच्या घरपट्टी सवलत योजनेचा लाभ घेतला असून तब्बल ४.२० कोटी रुपयांची घसघशीत सूट मिळवली आहे. या योजनेच्या माध्यमातून महापालिकेला देखील चांगलाच फायदा झाला असून दोन महिन्यात ८२.६५ कोटी रुपयांचा महसूल महापालिकेला मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत महापालिकेच्या घरपट्टीच्या महसुलात तब्बल २१ कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.

नियमित करदात्यांसाठी महापालिकेने १ एप्रिलपासून त्रैमासिक कर सवलत योजना सुरू केली आहे. याअंतर्गत एप्रिल महिन्यात घरपट्टी एकरकमी भरणाऱ्या करदात्यांना बिलाच्या रकमेतून आठ टक्के, तर मे महिन्यात सहा टक्के सवलत दिली गेली. जूनमध्ये संपूर्ण कर भरल्यास तीन टक्के सवलत देण्यात येणार आहे. सौरउर्जा प्रकल्प, सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टींग, सांडपाण्याचा पुर्नवापर करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पाच टक्के सवलत दिली जात आहे. गृहनिर्माण संस्था किंवा निवासी क्षेत्रात ईलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन कार्यान्वित असल्यास देखील दोन टक्के सवलत देण्यात येत आहे. ई-पेमेंट किंवा डिजीटल पेमेंटसाठी पाच टक्के किंवा तीन हजार यापैकी कमी असेल ती रक्कम देय आहे. या सवलत योजनेला करदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून १ एप्रिल ते ३१ मे २०२४ दरम्यान दोन लाख पाच हजार ५०४ मिळकतधारकांनी ८२.६५ कोटी रुपयांची घरपट्टी भरत चार कोटी २० लाख ८५ हजार ६७३ रुपयांची सूट मिळविली आहे. सोलर प्रकल्प असणाऱ्या मिळकतधारकांनी १६ लाख २४ हजार ९२४ रुपयांची अतिरीक्त सवलत मिळविली आहे.

लाभ घेण्यात सिडको आघाडीवर

सातूपर विभागातील २१ हजार ८१६ मिळकतधारकांनी १० कोटी, नाशिक पश्चिममधील २३ हजार ८०५ मिळकतधारकांनी १६.७९ कोटी, नाशिक पूर्व विभागातील ३७ हजार ५८८ मिळकतधारकांनी १३.१३ कोटी, पंचवटी विभागातील ३७ हजार ४२९ मिळकतधारकांनी १५.१८ कोटी, सिडकोतील ४७ हजार ६९२ मिळकतधारकांनी १६.४७ कोटी, तर नाशिक रोड विभागातील ३७ हजार १७४ मिळकतधारकांनी ११ कोटी रुपयांची घरपट्टी भरली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा घरपट्टीच्या महसुलात २१ कोटींनी वाढ झाली आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात करसवलत योजनेला मिळकतधारकांचा चांगला प्रतिसाद लाभला. जून महिन्यात तीन टक्के करसवलत दिली जाणार आहे. करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

– विवेक भदाणे, उपायुक्त(कर), महापालिका.


हेही वाचा-