Nashik Police : चौकसभांमधून नाशिक पोलिस नागरिकांशी साधणार संवाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नागरिक व पोलिसांमधील संवाद वाढवण्यासोबतच पोलिसांची प्रतिमा अधिक सकारात्मक करण्यासाठी शहर पोलिसांकडून चौकसभा घेण्यात येणार आहेत. यांमधून पोलिस नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, तक्रारी जाणून घेतील. तसेच नागरिकांनी कोणत्या  खबरदारी घ्याव्यात, यासाठी मार्गदर्शन करतील. महिन्यातून चार वेळेस नागरिकांशी संवाद साधण्याचे आदेश प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत.

गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासोबत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नागरिक व पोलिसांमधील संवाद महत्त्वाचा असतो. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांचे संकेतस्थळ अद्ययावत करून नागरिकस्नेही केले जात आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत पोलिस ठाणेनिहाय प्रभारी अधिकाऱ्यांना नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत. शहरातील अवैध धंदे बंद करून संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखांसह चार अतिरिक्त पथके कार्यरत आहेत. तसेच रेकॉर्डवरील 7 गुन्हेगारांचीही यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. दरम्यान, नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, तक्रारी जाणून घेण्यासाठी महिन्यात दोन ते चार सभा घ्याव्यात, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील दाट लोकवस्तीसह, बाजारपेठा, झोपडपट्टीमध्ये बैठका घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व व्यापारी, व्यावसायिकांसह रिक्षाचालक व हॉकर्सची यादी प्रभारी निरीक्षकांनी तयारी केली आहे. या आधारे पोलिस व नागरिकांची चर्चा होणार असून त्यातून संवाद बळकट होईल, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रभारी अधिकारी नागरिकांशी संवाद साधतील. नागरिकांच्या तक्रारी निवारण्यासह पोलिसांच्या कार्यपद्धतीत नागरिकांकडून काही बदल अपेक्षित असल्यास त्यावरही चर्चा होईल. तसेच या बैठकांचा व त्यानंतर झालेल्या उपाययोजना, बदलांचा अहवालही तपासला जाईल.

अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक

चर्चा यावर होणार :

बैठकीत नागरिकांच्या तक्रारी, समस्या ऐकून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याने त्यावरही चर्चा होणार आहे. यात मुलांसह पालकांचे प्रबोधन केले जाईल. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांची, नुकसानीची जाणीव करून दिली जाईल, जेणेकरून त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल. पोलिसांविरोधातील तक्रारींचीही दखल घेतली जाणार असून, गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांचे खबऱ्यांचे जाळेही बळकट करण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे.

हेही वाचा :

The post Nashik Police : चौकसभांमधून नाशिक पोलिस नागरिकांशी साधणार संवाद appeared first on पुढारी.