नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच

भाजप www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा माहोल सोमवारी (दि.19) मतमोजणीनंतर शांत झाला. महाविकास आघाडी सरकार राज्यातून पायउतार झाल्यानंतर प्रथमच नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली होती. मात्र निकालानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. तर भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हक्काच्या आदिवासीपट्ट्यात भारतीय जनता पक्षाच्या पदरात अपयश पडले.

नाशिकसह कळवण व दिंडोरी या तीन तालुक्यांसाठी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली आहे. तब्ब्ल 41 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. तर केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपला अवघ्या 5 ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या लोकसभा मतदारसंघातील कळवण आणि दिंडोरी तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही तालुक्यांत स्थानिक मतदारांनी राष्ट्रवादीला प्राधान्य दिले. ना. डॉ. पवार यांचा नगर परिषद निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणुकीत करिश्मा चालला नसल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या तीन दिवस राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे नाशिक दौर्‍यावर होते. त्यांनी ना. डॉ. पवार यांच्यासोबत मतदानापूर्वीच भेट घेत ग्रामपंचायत निवडणुकीसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली होती. आदिवासी भागात दांडगा जनसंपर्क असलेले भाजपचे दोन मंत्री निवडणुकीपूर्वी तळ ठोकूनही निकालात पीछेहाट झाल्याने दोन्ही मंत्र्यांच्या कार्यशैलीवरच पक्ष पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नाशिक तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादी आणि भाजपला समान कौल देत प्रत्येकी चार ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात दिल्या आहेत. कळवण व दिंडोरी तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे. आदिवासी बहुल भागात भाजपच्या ना. डॉ. पवार यांचा गावपातळीवरील कमी झालेल्या संवादाचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत बसला असून, ना. डॉ. गावित यांचा नाशिक दौराही कामी न आल्याची चर्चा रंगत आहे.

ना. डॉ. गावित-झिरवाळ गुफ्तगू
भाजपचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी नाशिक दौर्‍यात शासकीय विश्रामगृहात मुक्कामी होते. सलग दोन दिवस विधानसभा उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ हे ना. डॉ. गावित यांच्या भेटीला आले होते. आदिवासी विकास महामंडळाची बैठक संपल्यानंतर दोघेही नाशिकमध्ये विविध मान्यवरांच्या भेटीला गेले होते. या दरम्यानच ना. डॉ. गावित व झिरवाळ यांच्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात गुफ्तगू झाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच appeared first on पुढारी.