नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंमधून ऑलिम्पिक, राष्ट्रकुल तसेच इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत पदक विजेते खेळाडू घडविण्यात क्रीडा मार्गदर्शकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. या क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीसाठी भारतीय खेळ प्राधिकरण अर्थात ‘साई’च्या धर्तीवर राज्यात नवी श्रेणी तयार केली जाणार आहे. क्रीडा मार्गदर्शकांचे 53 आणि सहायक क्रीडा मार्गदर्शकांचे 100 पदे बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर क्रीडा मार्गदर्शकांची श्रेणीनिहाय पदे मानधन तत्त्वावर नियुक्तीची नियमावली सन 2010 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, मानधन अल्प असल्याने चांगल्या दर्जाचे क्रीडा मार्गदर्शक उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे क्रीडा विकासाच्या दृष्टीने व उच्च गुणवत्तेचे क्रीडा मार्गदर्शक व सहायक क्रीडा मार्गदर्शक अशी श्रेणी निर्माण करून सुधारित वाढीव दराने मानधन देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार क्रीडा मार्गदर्शकांना 60, तर सहायक क्रीडा मार्गदर्शकांना 40 हजार मानधन मिळणार आहे. ही नियुक्ती चार वर्षांसाठी असणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने क्रीडा मार्गदर्शक व सहायक क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता (बारावी उत्तीर्ण व संगणकाचे ज्ञान), तर वयोमर्यादा (किमान 25 व कमाल 55) निश्चित केली आहे. एनआयएस (पदविका) अथवा आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू अशी क्रीडाविषयक अर्हता असणार आहे. दरम्यान, क्रीडा मार्गदर्शक व सहायक क्रीडा मार्गदर्शकांना विभागीय व जिल्हा क्रीडा संकुलांच्या असलेल्या केंद्रांवर मार्गदर्शन करावे लागणार आहे. संघटनेच्या स्पर्धांच्या ठिकाणी उपस्थित राहून खेळाडूंची यादी तयार करण्याची जबाबदारीही संबंधितांवर असणार आहे.
या खेळांसाठी होणार नियुक्ती…
अॅथेलेटिक्स, जलतरण, सायकलिंग, हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, आर्चरी, जिम्नॅस्टिक, बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग, शूटिंग, ज्युदो, कबड्डी, खो-खो, तायक्वांदो, मलखांब, लॉन टेनिस.
जिल्हानिहाय उपलब्ध पदे अशी….
जिल्हा मार्गदर्शक सहायक
मुंबई शहर 03 02
मुंबई उपनगर 01 03
पालघर 01 03
ठाणे 01 03
रायगड 01 03
नाशिक 03 02
धुळे 01 03
नंदुरबार 01 03
जळगाव 01 03
पुणे 03 03
अहमदनगर 01 03
सोलापूर 01 03
कोल्हापूर 03 02
सांगली 01 03
सातारा 01 03
रत्नागिरी 01 03
सिंधुदुर्ग 01 03
छत्रपती संभाजीनगर 03 02
जालना 01 03
परभणी 01 03
हिंगोली 01 03
बीड 01 03
लातूर 03 02
नांदेड 01 03
धाराशिव 01 03
नागपूर 03 02
वर्धा 01 03
भंडारा 01 03
गोंदिया 01 03
गडचिरोली 01 03
चंद्रपूर 01 03
अमरावती 03 02
अकोला 02 02
वाशिम 01 03
बुलडाणा 01 03
The post Nashik Sports : आता क्रीडा मार्गदर्शकांसाठी स्वतंत्र श्रेणी appeared first on पुढारी.