नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, कचऱ्याचे विलगीकरण न करणे आदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी घनकचरा व्यवस्थापन विभागाने गेल्या वर्षभरात ९८० जणांवर कारवाई केली असून, या कारवाईतून तब्बल ३० लाख ७५,३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी ही माहिती दिली आहे. सिंगल युज प्लास्टिकवर शहरात बंदी आहे. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या तसेच उत्पादनांचा साठा, विक्री व वापर करणे दंडनीय अपराध आहे. मात्र, त्यानंतरही शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर सर्रासपणे होत असल्याचे खतप्रकल्पावर मोठ्या प्रमाणावर जमा होत असलेल्या प्लास्टिक कचऱ्यातून समोर आले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्लास्टिकचा वापर, विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली असून, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत तब्बल २७८ जणांकडून १४ लाख ८५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६चा भंग करत नदी-नाल्यांमध्ये कचरा टाकल्याप्रकरणी ३९ जणांकडून ८९ हजार ९०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी ४८ जणांकडून ३ लाख २९ हजार ५०० रुपये, रस्ते मार्गांवर अस्वच्छता केल्याप्रकरणी १८५ जणांकडून १ लाख १८ हजार ६५० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
पाळीव प्राण्यांमुळे रस्त्यांवर अस्वच्छता केल्याप्रकरणी ३ जणांकडून सहा हजार रुपये, मोकळ्या भूखंडांवर बांधकामाचा मलबा टाकल्याप्रकरणी ११६ जणांकडून २ लाख १६ हजार ४०० रुपये सेवा कर, तर २४ जणांकडून २ लाख ४२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पाळापाचोळा, प्लास्टिक, रबर आदी सर्व प्रकारचा कचरा जाळल्याप्रकरणी ३५ जणांकडून १ लाख ९५ हजार रुपये, तर सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मैला टाकणाऱ्या १ व्यक्तीकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ५४ जणांकडून ५४ हजार ७५० रुपये, उघड्यावर लघुशंका करणाऱ्या ८ जणांकडून ४८०० रुपये, जैविक कचरा उघड्यावर टाकणाऱ्या ८ जणांकडून १ लाख ३५ हजार, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या ९ जणांकडून १० हजार ५०० रुपये, तर पाण्याचा अपव्यय करणाऱ्या २ जणांकडून ६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आल्याची माहिती डॉ. पलोड यांनी दिली.
कचरा विलगीकरण न करणाऱ्या १७० जणांवर कारवाई
ओला व सुका करण्याचे विलगीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्र डब्यात घंटागाडीत टाकणे गरजेचे आहे. मात्र, अनेक नागरिकांकडून या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. याविरोधात महापालिकेने कारवाईची मोहीम उघडली असून, गेल्या वर्षभरात तब्बल १७० नागरिक, व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा: