NMC Divisional Commissioner: गेडाम, कुशवाह यांची नावे आघाडीवर

नाशिक महानगरपालिका pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे शुक्रवारी (दि. ३१) निवृत्त होत आहेत. या पदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत महसुल विभागात चर्चा रंगत आहे. नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त प्रविण गेडाम तसेच माजी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नावे आयुक्तपदासाठी आघाडीवर असली तरीही अन्य काहीजण नियुक्तीसाठी लॉबिंग सुरू केले आहे.

आयुक्त गमे हे प्रदीर्घ सेवेनंतर महसूल विभागामधून सेवानिवृत्त हाेत आहेत. गमे यांच्या निवृत्तीला अद्याप दोन दिवसांचा कालावधी बाकी असताना त्यांचा उत्तराधिकारी कोण यावरुन चर्चांना उधाण आले आहे. आयुक्त पदासाठी गेडाम, कुशवाह यांच्यासोबत माजी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. तसेच आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यादेखील इच्छूक आहे. दरम्यान, आयुक्तपदी विराजमान होणाऱ्या अधिकाऱ्याला सर्वप्रथम नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. पाच जिल्ह्यांमध्ये विस्तारलेल्या मतदारसंघामध्ये निवडणूक सुरळीत व निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आव्हान उभे ठाकणार आहे. तसेच २०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाचे शिवधनुष्यदेखील नूतन आयुक्तांना पेलावे लागणार आहे. या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांमधील प्रश्नदेखील हाताळावे लागणार आहे. त्यामुळे येत्याकाळातील विभागातील आव्हाने लक्षात घेता आयुक्तपदाच्या खुर्चीत कोण विराजमान होणार हे पाहाणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

नयना गुंडे प्रयत्नशील

आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे या विभागीय आयुक्तपदासाठी प्रयत्नशील आहेत, अशी खात्रीलायक माहिती महसुल विभागातून मिळते आहे. गुंडे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्यास त्यांच्या जागी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची नेमणूक होऊ शकते. मनिषा खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा पत्नी आहेत.

हेही वाचा: