नाशिक शहरात कोरोना संशयितांच्या आजपासून चाचण्या

कोरोना चाचणी, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कोरोना संकटाची काळी छाया पुन्हा एकदा गडद होऊ लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेत अलर्ट दिल्यानंतर नाशिक महापालिका कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी सज्ज झाली आहे. नाशिकरोड येथील स्व. बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालय व जुन्या नाशकातील झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोना बाधितांसाठी विशेष कक्षाची स्थापना केल्यानंतर कोरोना संशयितांच्या चाचण्यांना शुक्रवार (दि. २२) पासून सुरुवात केली जाणार आहे. यासाठी बिटको रुग्णालयातील मॉलिक्युलर लॅब सुरू केली जाणार आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. (Nashik Corona Update)

कोरोना महामारी पुन्हा एकदा परतीच्या मार्गावर आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत शहरात कोरोनाने थैमान घातले होते. चार लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर यात चार हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला. मार्च २०२२ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नाशिककरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु, आता पुन्हा एकदा केरळ राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळल्याने देशभरातील वैद्यकीय यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही कोल्हापूरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय व कुटुंबकल्याण मंत्रालयाने अलर्ट जारी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी व्हीसीद्वारे राज्यातील यंत्रणांसमवेत बैठक घेतली. (Nashik Corona Update)

बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिक महापालिकेच्या तयारीचाही आढावा घेतला असून, महापालिकेला कोरोनासंदर्भात दक्षता घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी कोरोनासाठी राखीव बेड, मास्क, पीपीई किट, ऑक्सिजन व्यवस्था, जम्बो सिलिंडर्स तसेच औषधसाठ्याचा आढावा घेत सर्व सज्जतेचे आदेश दिले आहेत. सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे यांसारखी लक्षणे आढळल्यास अशा संशयित रुग्णांची कोरोना टेस्ट करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला दिल्या आहेत. शुक्रवारपासून कोरोना लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. यासाठी बिटको रुग्णालयातील मॉलिक्युलर लॅबही सुरू केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई

कोरोनाबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चुकीचे संदेश पसरवले जात आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. खोटे संदेश पसरवणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे निर्देशही यंत्रणेला दिले आहेत.

हेही वाचा :

 

The post नाशिक शहरात कोरोना संशयितांच्या आजपासून चाचण्या appeared first on पुढारी.