कोराटेत तरुणावर बिबट्याचा हल्ला 

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील कोराटे येल कदम या तरुणावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले. गुरुवारी (दि.२१) सकाळी ६.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने वाघनाल्यामध्ये बिबट्याचे वास्तव्य नजरेस पडले आहे. त्याने दोन दिवसांपूर्वीच सह्याद्री कंपनीत जाणाऱ्या तरुणावर हल्ला चढवला होता. नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकत तरुण बचावला होता. त्यानंतर गुरुवारी पुन्हा विष्णू शिंदे यांच्या शेतालगत असणाऱ्या शेतात विशाल कदम हा सकाळी फेरफटका मारत असताना अचानक पाठीमागून बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या मानेला व खांद्याला दोन ठिकाणी पंजे मारून जखमी केले आहे. विशालने जिवाच्या आकांताने केलेली आरडाओरडा एेकून धावून आलेल्या शेतकऱ्यांना पाहून बिबट्याचे धूम ठोकली.

विशालला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या कोराटे व पालखेड परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. ते वाडी-वस्त्यांपर्यंत येत असल्याने स्थानिकांना शेतात जाणेदेखील मुश्कील झाले आहे. नागरिकांच्या मागणीनुसार गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वाघनाला येथे पिंजरा लावण्यात आला आहे. परंतु, अजूनही बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला नाही. दुसरीकडे हल्ल्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. अधिकारी येतात, पिंजरा लावतात आणि निघून जातात. परंतु, घटना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. बिबट्यांचा वावर आढळून येणाऱ्या भागात जास्तीत जास्त पिंजरे लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

हेही वाचा :

The post कोराटेत तरुणावर बिबट्याचा हल्ला  appeared first on पुढारी.