नाशिकमध्ये जैवविविधता चांगली असून, शहरात २४ प्रकारचे फुलपाखरू, तर ३४ प्रजातींचे पक्षी असल्याची माहिती महापालिकेने केलेल्या पर्यावरणीय सर्वेक्षणातून समोर आली आहे. ज्या भागात जैवविविधता अधिक असते, अशा ठिकाणी पर्यावरणही चांगले राहते, तथापि या जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज आहे. शहरात प्रतिहेक्टर १३२० झाडे लावली जात असून, पर्यावरणातील जैवविविधता टिकण्यासाठी मात्र प्रतिहेक्टरी दोन ते अडीच हजार झाडांची लागवड करणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष या अहवालातून नोंदविण्यात आला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी खासगी संस्थेद्वारे पर्यावरणीय सर्वेक्षण करून अहवाल सादर केला जातो. स्थलांतरित पक्षी हा परिसंस्थेतील महत्त्वाचा भाग असल्याने प्राणी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. निसर्गातील एखादी प्रजाती नष्ट झाली, तर संपूर्ण परिसंस्था कोलमडते. त्यामुळे पर्यावरणीय समतोल राखणाऱ्या जीवसृष्टीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये फुलपाखरू आणि पक्ष्यांचा समावेश होतो. फुलपाखरे आणि पतंग निसर्गातील महत्त्वपूर्ण भाग आहे. फुलपाखरे आणि पतंग अत्यंत मौल्यवान असून त्यांचे संवर्धन केले जाणे गरजेचे आहे. कारण फुलपाखरे सजीवसृष्टीचा एक भाग असून समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक आहे. नाशिक शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहर परिसरात फुलपाखरांच्या २४ प्रजाती आढळल्या आहेत. विविध परिसंस्थांमध्ये पक्षी महत्त्वाची भूमिका बजावतात. पक्षी निर्सगातील एक अविभाज्य घटक आहे. निसर्गाची सफाई, परागकणांची वाहतूक, कीटक खाणे आदीसंख्या प्रमुख भूमिका पक्षी बजावतात. पक्ष्यांची चांगली विविधता निरोगी पर्यावरण दर्शविते. पक्षी प्रदूषणाचे सूचक म्हणून काम करतात. सर्वेक्षणात ३४ प्रकारचे पक्षी आढळले आहेत. त्यामध्ये काही पक्षी पाण्याच्या स्रोतांजवळ राहणारे आहेत. मैना, कावळा, कबुतर, बुलबुल, सनबर्ड, कोतवाल, गाय, बगळे आदी पक्ष्यांची नोंद या सर्वेक्षणादरम्यान घेण्यात आली.
फुलपाखरांच्या दुर्मीळ प्रजाती
नाशिक शहर परिसरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात इंडियन क्रो, ब्लू मोर्मोन, ब्लू प्यान्सी, ब्लू टायगर, कॉमन ग्रास यलो, कॉमन लेपर्ड, रेड पॅरोट, यलो पॅन्सी, प्लेन टायगर, लाइम बटरफ्लाय, स्मॉल ग्रास यलो, स्मॉल ऑरेंज टीप, यलो पॅन्सी आदी प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळल्या आहेत. १९७२ सालच्या वन्यजीव (संरक्षण) कायद्यानुसार कॉमन क्रो वगळता इतर फुलपाखरांचा समावेश संवेदनशील प्रजातींमध्ये होत नाही. कॉमन क्रो या प्रजातीच्या फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद वन्यजीव कायद्यात आहे.
अहवालातील प्रमुख शिफारस
शहरी भागात हरित पट्टे, उद्यान, खेळाची मैदाने, निर्माण करणे. शहरातील हरित पट्ट्यांचे सुशोभीकरण करणे गरजेचे असून, तसे केल्यास याठिकाणी राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावेल, अशी प्रमुख शिफारस या अहवालाद्वारे करण्यात आली आहे. प्रतिहेक्टरी १३२० झाडांची लागवड केली जात आहे. ही लागवड संख्या कमी असून प्रतिहेक्टरी दोन ते अडीच हजार झाडांची लागवड करणे आवश्यक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वृक्षलागवड केल्यानंतर संवर्धनावरही महापालिकेने लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही पर्यावरणीय अहवालात म्हटले आहे.
पर्यावरण सर्वेक्षणातील निष्कर्ष
* जैवविविधता चांगली पण टिकवण्याची गरज
* वृक्षलागवड प्रतिहेक्टरी दोन ते अडीच हजार आवश्यक
* फुलपाखरू, पक्ष्यांची जैवविविधता चांगली. पर्यायाने पर्यावरणाचा समतोल चांगला.
* लोकसंख्यावाढ, शहरीकरण, औद्योगीकरणामुळे जैवविविधता धोक्यात
* दूषित पाणी, घनकचरा व्यवस्थापनामुळे पर्यावरण संतुलन अडचणीत
The post NMC Nashik | पर्यावरण निष्कर्ष : फुलपाखरांच्या २४, तर पक्ष्यांच्या ३४ प्रजाती appeared first on पुढारी.