Online Exam: स्पाय कॅमेऱ्यातून प्रश्न पाठवून उत्तरे दिली

Online exam pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तलाठी भरती परीक्षेत गतवर्षी हायटेक कॉपी प्रकार उघडकीस आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच मार्च २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेतही डमी उमेदवाराने परीक्षा देत त्याच्याकडील स्पाय कॅमेऱ्यातून प्रश्न दुसऱ्यांना पाठवून उत्तरे दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात योगेश सावकार (४३, रा. इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, रणजित जारवाल व सौरभ जारवाल (दोघे रा. खोंडेगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह इतर दोघांविरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ व विनिर्दिष्ट होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, दिंडोरी रोडवरील पुणे विद्यार्थिगृह, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे १५ एप्रिल २०२३ रोजी महानिर्मिती कंपनीने कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) या पदासाठी घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेत हा प्रकार घडला. संशयित उमेदवाराने अर्ज भरताना दिलेले छायाचित्र व ऑनलाइन परीक्षेस हजर असलेल्या उमेदवाराचे छायाचित्र जुळले नाही. त्यामुळे तोतया डमी असल्याचे उघड झाले. तसेच संशयित सौरभ जारवाल याने परीक्षा देताना त्याच्याकडील स्पाय कॅमेऱ्यातून प्रश्न इतर संशयितांना पाठवले. त्यानंतर इतर संशयितांनी पाठवलेल्या उत्तरावरून परीक्षा दिली. त्यामुळे डमी उमेदवार बसवून तसेच हायटेक कॉपी करून संशयितांनी परीक्षेत गैरप्रकार केल्याचे उघड झाल्याने चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post Online Exam: स्पाय कॅमेऱ्यातून प्रश्न पाठवून उत्तरे दिली appeared first on पुढारी.