Sanjay Raut : त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे

संजय राऊत,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पालकमंत्री दादा भुसे आणि पोलिसांच्या संगनमताने नाशिकमध्ये नशेचा बाजार सुरू असल्याचा पुनरुच्चार करत पालकमंत्र्यांचे अभय असल्यामुळेच ड्रग्ज रॅकेटवर आजवर कारवाई झाली नाही. त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

ड्रग्जविरोधात शुक्रवारी (दि. २०) नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या आक्रोश मोर्चानिमित्त गुरुवारी सायंकाळी नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी पालकमंत्र्यांवर पुन्हा टीकास्त्र डागले.

राऊत म्हणाले की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जे घडतेय ते दुर्दैवी आहे. भुसे यांच्या संगनमतानेच नाशकात नशेचा बाजार मांडला गेला आहे. तरुण-तरुणी याचे बळी ठरत आहेत. अनेक घर उद्ध्वस्त होत आहेत. पोलिसांना हे सगळे माहिती आहे. मात्र तेदेखील यात सहभागी असून, पालकमंत्र्याचेच पोलिसांना अभय असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. पैशासाठी आपण काय करतोय, हे त्यांना कळत नाही. हे सुरूच राहिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, प्रसंगी नाशिक बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील सरकार दारूबाज आहे. आज बियर स्वस्त करून लोकांना नशेच्या आहारी जाऊ देत आहे. शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी वाइनचा निर्णय घेतला, तेव्हा हेच फडणवीस विरोध करत होते, अशी पुस्तीही राऊत यांनी यावेळी जोडली.

गोऱ्हे कोणाला भेटायला आल्या?

नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांचे खा. राऊत यांनी खंडन केले. ललित पाटील यांना मी कधीच भेटलो नाही, असे नमूद करत, नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणात सर्वात आधी काँग्रेसचे नाना पटोले यांनी माहिती दिली. त्यामुळे नीलम गोऱ्हे कोण, त्यांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचा विश्वास नाही असे सांगत, गोऱ्हे यांनी राजीनामा दिलाय ना? त्याच त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला आल्या होत्या का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी प्रायश्चित्त करावे

जरांगे पाटील हा फकीर माणूस आहे. त्याला तुम्ही विकत घेऊ शकत नाही, असे सांगत, मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत आता संपुष्टात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रायश्चित्त करावे, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

हेही वाचा :

The post Sanjay Raut : त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे appeared first on पुढारी.