‘ड्रग्ज’ विक्री साठी गिऱ्हाईक शोधणाऱ्या संशयितास अटक

ड्रग्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ‘एमडी’ साठी गिऱ्हाईक शोधणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पकडले आहे. किरण चंदु चव्हाण (२३, रा. सामनगाव रोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून १९.३९ ग्रॅम वजनाचा एमडी साठा जप्त केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांची विक्री, साठा व वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी गस्तीपथक नेमून संशयितांची धरपकड सुरु केली आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनची गस्त सुरू होती. अंमलदार विशाल कुंवर आणि समाधान वाजे यांना सामनगाव रोड परिसरात एक संशयित एमडी विक्री करण्यासाठी गिऱ्हाईक शोधत असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यास आला. सहायक निरीक्षक सचिन जाधव, सहायक उपनिरीक्षक विवेक पाठक, अंमलदार मनोहर शिंदे, स्वप्नील जुंद्रे, महेश खांडबहाले, तेजस मते आदींच्या पथकाने संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडून वजनकाट्यासह एमडी हस्तगत करण्यात आले. दरम्यान, संशयित किरण याने एमडी कोणाकडून आणले, त्याच्याकडे एमडीचा किती साठा आहे का, याआधी त्याने किती एमडी विक्री केली, याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे.

मुंबई, गुजरातमधून एमडी

शहर पोलिसांनी नाशिकरोड, इंदिरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून एमडी विक्री व तयार करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई केल्या. त्यातील एका टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यास आली. तरीदेखील शहरात अद्याप एमडी विक्री सुरुच असल्याचे वारंवार उघड होत आहे. एमडीचा हा साठा मुंबई, गुजरातमार्गे नाशिकमध्ये येत असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

The post 'ड्रग्ज' विक्री साठी गिऱ्हाईक शोधणाऱ्या संशयितास अटक appeared first on पुढारी.