Sant Nivruttinath Palkhi : दातली येथे रंगला पहिला रिंगण सोहळा

रिंगण सोहळा,www.pudhari.news

दातली (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण बुधवारी (दि. 7) सायंकाळी 4.30 च्या सुमारास सिन्नर तालुक्यातील दातली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. लोणारवाडीतील आदरातिथ्य घेऊन पालखीने सिन्नर शहरवासीयांचा अल्पोपाहार, कुंदेवाडीकरांच्या आमरस-पुरणपोळीचा आस्वाद घेतला. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी हजारो वैष्णव भक्तांसह दातलीत रिंगण सोहळा मैदानावर दाखल झाली. रिंगण सोहळ्याची अनुभूती घेतल्यानंतर पालखी खंबाळेकडे मुक्कामी गावी मार्गस्थ झाली. यावेळी जिल्ह्याभरातून हजारो भाविकांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.

माजी सरपंच लक्ष्मण शेळके व कैलास शेळके या बंधूंच्या साडेतीन एकर जागेत भव्य दिव्य रिंगण सोहळा पार पडला. यावेळी तुझा पाहुनी सोहळा, माझा रंगला अभंग गेला शिणवटा सारा, मेघ झाले पांडुरंग… नाम निवृत्तीचे घेता, डोली पताका डौलात, अश्व धावती रिंगणी नाचे विठू काळजात या संत तुकोबारायांच्या अभंगाची प्रचिती येत होती. दातलीकरांनी  व राजेश जुन्नरकर यांनी रांगोळी काढून फुलांचा सडा टाकला. वायुवेगाने अश्वमेध धावू लागतात. भक्ती सागरात वारकर्‍यांनी रिंगणामध्ये धाव घेत फेरा पूर्ण केला. पालखी सोहळ्याचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव सोमनाथ घोटेकर, पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ, रामकृष्णदास महाराज लहवितकर, एकनाथ महाराज गोळेसर, कैलास महाराज तांबे, जालिंदर महाराज  दराडे आदींनी रिंगण सोहळा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
ई. के भाबड यांनी सूत्रसंचालन केले. देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज अहिरे, माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, युवा नेते उदय सांगळे यांसह तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच अनेक मान्यवरांनी रिंगण सोहळ्यास भेट देत दर्शन घेतले.

जेसीबीच्या सहाय्याने पुष्प वर्षाव
भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण दातली येथे पार पडले. दातलीकरांनी जेसीबीच्या साह्याने पुष्पवर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी केली. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी दातलीच्या वेशीवर आल्यानंतर भजनी मंडळाने टाळ मृदंगाच्या गजरात रिंगण सोहळ्याच्या ठिकाणापर्यंत पालखीचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
पोलिस उपअधीक्षक सोहेल शेख यांनी रिंगणस्थळाला भेट दिली. एमआयडीसी पोलिस स्टेशनकडूनही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. सिन्नर, एमआयडीसी व वावी पोलिस ठाण्याचे सहा वरिष्ठ अधिकारी, पोलिस कर्मचारी,  होमगार्ड तसेच जिल्हा मुख्यालयाकडूनही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दातली ग्रामस्थांच्या वतीने स्वयंसेवकांची साखळी तयार करण्यात आली होती.

हेही वाचा :

The post Sant Nivruttinath Palkhi : दातली येथे रंगला पहिला रिंगण सोहळा appeared first on पुढारी.