Nashik : जखमी वन्यजिवांची होरपळ सुरूच, उपचार केंद्राचे काम संथगतीने

वन्यजीव उपचार केंद्र नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात रस्ते अपघात वा इतर कारणांनी जखमी झालेल्या प्राणी, पक्ष्यांवर उपचारांची सुविधा नसल्याने त्यांना उपचार व संगोपनासाठी मुंबई-पुणे येथे पाठवावे लागते. त्यात जखमी वन्यजिवांना मोठ्या प्रमाणात त्रास करावा लागतो. वन्यजिवांच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी म्हसरूळ येथे उभारण्यात येणाऱ्या वन्यजीव उपचार केंद्र अर्थात ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे जखमी वन्यजिवांची होरपळ सुरूच असून, वन्यजीवप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अपघातात जखमी होणार्‍या वन्य प्राण्यांचे प्रमाण, नैसर्गिक अधिवासामध्ये अधिपत्यावरून अथवा शिकारीवरून वन्यजिवांमध्ये आपसात संघर्ष होउन वन्यजीव जखमी होतात. काही वेळा अपघातात वन्यजिवांना शारीरिक ईजा होते. जिल्ह्यात वन्यजीव उपचार केंद्र नसल्याने संबंधित जखमी वन्यजिवांना प्रथमोपचारानंतर पुणे व मुंबई येथ हलविण्यात येते. उपचारांना मर्यादा आल्याने वन्यजीव दगावण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर १९९८ पासून नाशिक येथे वन्यजिवांसाठी अपंगालय व उपचार केंद्र उभारणीसाठी वनविभागाकडून पाठपुरावा सुरू होता.

एप्रिल २०२१ मध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर नाशिकमध्ये मंजूर झाले. म्हसरूळ फॉरेस्ट डेपोच्या जागेवर दि. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला होता. या केंद्रासाठी सुमारे पावणेचार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र तब्बल २० महिन्यांनंतरही केंद्राचे काम सुरूच आहे. संबंधित ठेकेदाराकडून अतिशय संथगतीने काम होत असल्याने जखमी वन्यजिवांची होरपळ कायम आहे.

दरम्यान, तांत्रिक अडचणीमुळे ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरचे काम पूर्णत्वाला विलंब होत आहे. आता बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून, सध्या पिंजरे बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पिंजऱ्यांची चाचणी पूर्ण झाल्यानंतर येत्या महिनाभरात सेंटर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे वनविभागातील सूत्रांनी सांगितले.

असे असणार उपचार केंद्र

बिबट्यांसाठी आठ, तर वाघांसाठी दोन मोठे पिंजरे व फिरणाऱ्यांसाठी पिंजऱ्यानुसार जाळी कुंपण, तरस- कोल्हा-लांडगा यांच्यासाठी १० पिंजरे, माकडांसाठी तसेच सापांसाठी स्वतंत्र पिंजरे, पक्ष्यांसाठी विशेषत: गिधाडांसाठी पिंजरे, पक्ष्यांसाठी फ्लाइंग टेस्टिंग युनिट, सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांसाठी इमारत.

तात्पुरते देखभाल केंद्रावरच मदार

वनविभागाने उंटवाडी रोडवरील जुन्या पश्चिम उपवनसंरक्षक कार्यालयात ‘तात्पुरते देखभाल केंद्र’ सुरू केले आहे. छोट्या पक्ष्यांसाठी पिंजरे तर मोठ्या आकाराच्या जखमी पक्ष्यांसाठी बंद खोल्यांचा वापर करण्यात येत आहे. याठिकाणी बिबटे, कोल्हे, उदमांजर, तरस यांसारख्या वन्यजिवांवरही उपचार केले जात आहेत. गंभीर जखमी वन्यजिवांना पुणे येथील उपचार केंद्रात हलविण्यात येते. तात्पुरते देखभाल केंद्रावरच जखमी वन्यजिवांची मदार आहे.

हेही वाचा :

The post Nashik : जखमी वन्यजिवांची होरपळ सुरूच, उपचार केंद्राचे काम संथगतीने appeared first on पुढारी.