जळगाव : पुढारी वृत्तसेवा- एकनाथ शिंदे हे इतके लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत की, त्यांना दिवसभरामध्ये 5 हजार पेक्षा अधिक लोक भेटतात आणि त्यांचे हे वैशिष्ट्य आहे की ते प्रत्येक माणसाची दखल घेतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर कुणी फोटो काढला असेल तर त्याचा काही त्यांच्याशी संबंध आहे असं म्हणणं योग्य नाही. असे स्पष्ट करत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पाटील म्हणाले, मी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना खूप चांगले आयुष्य लाभो, त्यांची विकासाची दृष्टी अजून विकसित व्हावी आणि आगामी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळू दे. तसेच एकनाथ शिंदेच्या रुपाने खूप संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले असल्याचे पाटील म्हणाले.
राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर बोलताना, विरोधकांनी टीका करणे हे त्यांचे कामच आहे. परंतु घडणाऱ्या घटना या चिंताजनक आहेत. प्रत्येक घटनेची खोलात जाऊन चौकशी केली जात असून यात जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा केली जाईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले. संजय राऊत आता जे बोलतात त्यांच्याकडे कुणीही लक्ष न देण्यासारखं ते राहिले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर लोकशाहीची सुंदरता अशी आहे की, कोणालाही काहीही म्हणण्याची स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोण काय म्हणत यावर टिपणी करणे मला योग्य वाटत नाही म्हणत आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणे चंद्रकांत पाटलांनी टाळले आहे.
2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जो विकास झाला. त्या विकासानंतर सरकार 2019 मध्ये यायला पाहिजे होतं. मात्र दृष्ट लागली आणि सरकार आले नाही. त्यामुळे विकास त्या काळात ठप्प झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर या सरकारमध्ये परत वेगाने विकास सुरू झाला असल्याचे पाटील म्हणाले.
एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त होणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले होते. दरम्यान याबाबत पत्रकारांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न उपस्थित केला असता सर्वच प्रश्नांना उत्तर देण्यास मी सर्वज्ञ नसल्याचे म्हणत एकनाथ खडसे यांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी जय हिंद जय महाराष्ट्र केला आहे.
हेही वाचा :
- Valentine’s Day : शिवानी रांगोळे-तितिक्षा तावडेचे व्हॅलेंटाईन डेचे असे खास प्लॅन्स
- Shivrayancha Chhava Movie : लवकरच ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटगृहात
The post अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले : चंद्रकांत पाटील appeared first on पुढारी.