
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मालकीच्या जागेत १४८, तर खासगी जागेत ४६ फटाके विक्री स्टॉल्स उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या फटाके स्टॉल्सच्या उभारणीत नियमांची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सहाही विभागांत विभागीय अधिकारी तसेच लीडिंग फायरमनची पथके तयार करण्यात आली आहेत. याबरोबरच अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांत फटाके विक्रेत्यांकडून स्टॉल्सची उभारणी केली जाते. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून परवानगी दिली जाते. किंबहुना दरवर्षी महापालिकेतर्फे फटाके विक्री स्टॉल्सकरिता लिलाव प्रक्रिया राबविली जाते. यंदा महापालिकेने २१४ फटाके विक्री स्टॉल्सकरिता लिलाव प्रक्रिया राबविली. त्यापैकी १४८ स्टॉल्सचे लिलाव झाले आहेत. यात नाशिक पूर्व विभागात १०, नाशिक पश्चिम २६, पंचवटी २९, सातपूर १८, नवीन नाशिक २२, तर नाशिकरोड विभागातील ४३ स्टॉल्सचा समावेश आहे. त्याचबरोबर आठ ठिकाणी खासगी जागांवर स्टॉल्स उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यात गंगापूरोडवरील डोंगरे वसतिगृहावरील ३० स्टॉल्सचा समावेश आहे. या फटाके विक्री स्टॉल्सच्या उभारणी करताना स्टॉल्सची रचना विस्फोटक नियम २००८ नुसार असणे अनिवार्य आहे. नियमानुसार नसल्यास अनधिकृत फटाका विक्रेत्यांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आयुक्तांनी शहरातील मनपा तसेच खासगी जागांवरील फटाका स्टॉल्सची रचना नियमानुसार आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विभागनिहाय तपासणी पथके तयार केली आहेत. यात विभागीय अधिकारी तसेच अग्निशमन विभागातील लीडिंग फायरमनचा समावेश आहे. या पथकाने तपासणी केल्यानंतरच संबंधित फटाके विक्रेत्याला ना हरकत दाखला दिला जाणार आहे.
… तर अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
फटाके विक्री स्टॉल्सची तपासणी व केलेल्या कारवाईचा अहवाल मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यासाठी पथकांना दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी 4 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आदेशांचे पालन न केल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांची असणार आहे.
हेही वाचा :
- आनंददायी ‘हिरवाई’
- Onion News : कांदा बाजारभावात घसरण सुरूच, दर 3,700 रुपयांच्या आत
- Ahmednagar Bribe News : अभियंत्याने स्वीकारली एक कोटींची लाच; दोघांविरुद्ध गुन्हा
The post अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर होणार गुन्हा दाखल appeared first on पुढारी.