अवकाळीच्या तडाख्यामुळे आदिवासी शेतकरी धास्तावले

www.pudhari.news

सुरगाणा, जि. नाशिक : पुढारी वृत्तसेवा – पिंपळसोंड, उंबरपाडा (पि) तातापाणी, गोणदगड, बरड्याचा माळ हा डांग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असून महाराष्ट्राचे शेवटचे टोक असून येथे शनिवारी (दि.१८) पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास वीजांच्या कडकडाटसह जोरदार किमान तासभर पाऊस अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे येथील शेतक-यांचे आंबा फळबाग व राहत्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सुरगाणा www.pudhari.news
गुजरात डांग तातापाणी सीमावर्ती भागात राहणारे आदिवासी बांधवांची अवकाळीच्या पावसाने वेढलेली घरे.

वीजांसह पाऊस पडल्याने आदिवासी शेतकरी गोपाळ कोळगा चौधरी (राहणार मालगोंदा) यांच्या रेड्यावर (हेला) तातापाणी परिसरातील बरड्याचा माळ या ठिकाणी वीज पडल्याने रेडा जागीच ठार झाला. तसेच गायी, गुरांना चारा, पाणी दिल्यानंतर शेतातील आंब्याच्या व वडाच्या झाडाखाली सावलीत जनावरे बांधली असताना दुपारी सव्वाचार ते साडेचार वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अचानक एक दुधाळ म्हैस देखील जखमी झाली आहे. तर काही जनावरे वाचली आहेत.

सुरगाणा www.pudhari.news
मालगोंदा ( खुंटविहीर) येथील गोपाळ कोळगा चौधरी यांच्या रेड्याचा वीज पडल्याने जागीच मृत्यू.

गोणदगड, तातापाणी, उंबरपाडा, पिंपळसोंड या भागात चक्रीवादळामुळे गोणदगड येथील आंनदा चौधरी या शेतक-याचे घरावरील पत्रे व वासे उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उंबरपाडा (पि) येथील माजी सैनिक शिवराम चौधरी, मोतीराम चौधरी, रंगू चौधरी यांच्या फळबागेचे नुकसान झाले आहे. पिंपळसोंड येथील लहानू चौधरी, काशिनाथ चौधरी, चंदू चौधरी यांच्या फळबागेचे नुकसान झाले आहे. पिंपळसोंड येथील लहानू चौधरी यांची फळबाग गुजरात राज्यातील ठेकेदारांना सुमारे दीड लाख रुपयांचा सौदा  करण्यात आलेला असताना त्यांचा अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. नुकतेच दोनच दिवसापूर्वी उंबरठाण, बेहुडणे, चुली, देवीपाडा, निंबारपाडा या भागात अवकाळीचा फटका बसल्याने स्थानिक रहिवाशी घराचे व फळबागेचे मोठे नुकसान झाले होते.  सध्या रोजच अवकाळी पाऊस पडत असल्याने येथील आदिवासी शेतकरी धास्तावले आहेत.

सुरगाणा www.pudhari.news
उंबरपाडा (पि) येथील माजी सैनिक शिवराम चौधरी यांच्या फळबागेचे नुकसान.

पशुवैद्यकीय अधिकारी भगवान भुसारे यांनी तत्काळ भेट देऊन वीज पडून ठार झालेल्या मृत रेड्याचे शवविच्छेदन केले. तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी कृषी सहाय्यक हरी गावित, कृषी पर्यवेक्षक विलास भोये यांना अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तहसिलदार रामजी राठोड यांनी तत्काळ या घटनेची दखल घेत तलाठी वैभव वाघ कृषी मंडळ अधिकारी यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. रेडा हा शेती कामाच्या नांगरणी साठी वापरत असल्याने पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आजच्या बाजार भावानुसार एका रेड्याची किंमत तीस ते पस्तीस हजार रुपये आहे. नुकसान पंचनामाप्रसंगी खुंटविहीरचे सरपंच आनंदा झिरवाळ, मोतीराम वाघमारे, परशुराम चौधरी, रतन चौधरी आदींनी पाहणी केली आहे.

सुरगाणा www.pudhari.news
पिंपळसोंड येथील आंबा उत्पादक शेतकरी लहानू चौधरी यांच्या फळबागेचे नुकसान.

हेही वाचा: