नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून शहर व ग्रामीण पोलिसांनी १६ मार्च ते २० मे या कालावधीत २ कोटी २७ लाख ४४ हजार ६७५ रुपयांचा अवैध मद्यसाठा व गुटखा साठा जप्त केला आहे. तसेच ७ हजार ४६३ टवाळखोर व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच देशभरात आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले. शहरात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व ग्रामीणमध्ये पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, अवैध मद्यवाहतूक, गुटखा वाहतूक रोखणे, अमली पदार्थ विक्री रोखण्यावर भर देण्यात आला. त्यानुसार शहर पोलिसांनी आचारसंहिता लागू झाल्यापासून १४ कट्टे, २२ काडतुसे, ७१ धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच ७ लाख ५० हजार १५५ रुपयांची १ हजार ५३३ लिटर देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे.
गुटखा साठा-वाहतूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी ९ गुन्हे दाखल करीत ३४ लाख ३६ हजार ५७३ रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. तर एमडी प्रकरणी तीन व गांजा प्रकरणी ३ गुन्हे दाखल केले. तसेच ३ हजार ८३२ टवाळखोर व गुन्हेगारांवर फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत व शस्त्रबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्या. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिसांनीही अवैध मद्यविक्री व वाहतूक प्रकरणी १ हजार ३१९ गुन्हे दाखल करीत १ कोटी २९ लाख १२ हजार ९०७ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. त्याप्रकरणी १ हजार २३३ संशयितांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तसेच अवैध गुटखा प्रकरणी ९८ जणांविरोधात ८० गुन्हे दाखल करून ५६ लाख ४५ हजार ४० रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. तर ३ हजार ६३१ टवाळखोर, गुन्हेगारांवर फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत व शस्त्रबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्या आहेत.
तडीपार, मोक्काचा दणका
सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी तडीपारी, मोक्का, स्थानबद्ध अशा कारवाई केल्या आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी २ व ग्रामीण पोलिसांनी एका टोळीवर मोक्का कारवाई केली आहे. तर एमपीडीए कायद्यानुसार १० गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तर सुमारे १०० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
हेही वाचा: