‘आडोसा’ ठरला कारवाईस कारणीभूत; मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लाच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कॅफेचालकास दमदाटी करून त्याच्याकडून दरमहा दोन ते तीन हजार रुपये घेणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर जनार्दन गोसावी (५३, रा. टाकळी रोड) याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

गोसावी हा विशेष शाखेत कार्यरत होता. त्याला शहरात थेट कारवाईचे अधिकार नव्हते, तरी तो एका कॅफेचालकाला कारवाईचा धाक दाखवून दरमहा पैसे घेत असल्याचे उघड झाले. संबंधित कॅफेचालकाने त्याच्या कॅफेत जोडप्यांना ‘आडोसा’ तयार केला होता. त्यामुळे गोसावीने कॅफेचालकाला कारवाईचा धाक दाखवला होता. कारवाई न करण्याच्या मोबदल्यात त्याने दरमहा दोन ते तीन हजार रुपयांची मागणी केली होती. तीन महिने कॅफेचालकाकडून पैसेही घेतले होते. मात्र कॅफेचालक त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार विभागाने सापळा रचून गोसावीला कॅफेचालकाकडून अडीच हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करीत आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गोसावीला निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post 'आडोसा' ठरला कारवाईस कारणीभूत; मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.