आदिवासी पट्ट्यात डोंगऱ्यादेव उत्सवाची सांगता

नाशिक, कनाशी : पुढारी वृत्तसेवा; कळवण तालुक्यातील ठिकठिकाणी तसेच गंगापूर गावात डोंगऱ्या देव (भाया) उत्सवाची गड घेऊन मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी शेतीवाडीत धान्याला बरकत येऊ दे, अशी आळवणी करण्यात आली.

कळवण तालुका हा आदिवासीबहुल भाग असल्याने या तालुक्यात जवळपास सगळ्याच खेडे व वाड्या, पाड्यात डोंगऱ्या देव (भाया) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातच गंगापूर गावात मार्गशीर्ष पौर्णिमेला भगत मुधानी मठावरील थोंबाची विधिवत पूजा करून थोंब उपटतो. त्यांच्या समवेत व्रतात सामील असलेल्या सर्व माउल्या, ग्रामस्थ, डोंगऱ्यादेवाचे गाणे म्हणत, गड घेण्यासाठी गौळाच्या दिशेने रवाना झाले होते. माउल्या रात्री गडाच्या पायथ्याशी जमल्या होत्या. तेथे भगत कन्सरा (नागली) तांदळाच्या सव्वाशे पूंजा टाकत पुजा केली. यावेळी डोंगऱ्यादेवाला, गावाला सुखी ठेव. आमच्या शेतीवाडीत धान्याला बरकत येऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. व्रताचा समाप्तीचा दिवस असल्याने येथे आदिवासी महिला, आबालवृद्ध, पाहुणेरावळे, सगेसोयरे मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाड्या-वस्त्यांवरून मागितलेल्या नारळ प्रसादाचे सर्वांना वाटप करत डोंगऱ्यादेवाच्या व्रताची सांगता करण्यात आली.

हेही वाचा :

The post आदिवासी पट्ट्यात डोंगऱ्यादेव उत्सवाची सांगता appeared first on पुढारी.