आमचे सरकार पॉझिटिव्ह अन् प्रॅक्टिकल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आमचे सरकार पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल असून, जिथे उद्योग मोठे होतात, तिथेच विकास होत असतो. त्यामुळे नाशिकच्या उद्योग जगताच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासारख्या असून, त्या सोडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. उद्योगवाढीवर शासनाने लक्ष केंद्रित केले असून, शक्य होईल तेवढी उद्योजकांची कामे मार्गी लावली जातील. त्यासाठी केंद्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार झपाट्याने काम करीत असून, ‘तुम्ही एका हाताने द्या, आम्ही दोन हाताने देऊ’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजकांना आश्वस्त केले.

सातपूरमधील हॉटेलमध्ये विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, सदस्यांसमवेत आयोजित बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष ललित बुब, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कुणाची गच्ची धरून, कुणाला त्रास देऊन, कुणाच्या इमारतीखाली जिलेटिनच्या कांड्या ठेवायला लावून धमकावण्याचे, पैसे काढण्याचे काम कुणी करत असेल, तर त्यांना आमचे सरकार माफ करणार नाही. बघताे, विचारतो, सांगतो नव्हे, तर काम करणारे आमचे सरकार असल्याचे ते म्हणाले. नाशिकच्या उद्योजकांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब लवकरच कार्यान्वित केली जाईल. इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर करण्यास काहीच हरकत नाही. उद्योग क्षेत्रातील भूमिगत गटाराचा प्रश्न अमृत-२ योजने अंतर्गत सोडविला जाईल. घनकचरा व्यवस्थापन, रिंग रोडचा प्रश्न निकाली काढला जाईल. नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येईल. तसेच औद्योगिक वसाहतीत शौचालये बांधण्याची कामे लवकरच सुरू केली जातील. सीईटीपीबाबतही पर्यावरण विभागाला आदेश दिले जाणार आहेत. एलबीटीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कुणी अधिकारी काम करीत नसतील, तर त्यांना आचारसंहितेनंतर नारळ दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योगमंत्री सामंत यांनी, नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचे सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य असून, भविष्यातही ते अग्रक्रमाने सोडविणार असल्याचे स्पष्ट केले. धनंजय बेळे यांनी प्रास्ताविकात नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्न मांडत, ते मार्गी लावण्याची विनंती केली. निमाचे उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.

वाढीव घरपट्टीचा निर्णय लवकरच मागे

नाशिककरांवर लादलेली जादा घरपट्टी कमी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते. मात्र, घरपट्टी कमी न झाल्यामुळे निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी, घरपट्टी कमी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. तसेच उद्योजकांच्या इतर प्रश्नांवरदेखील तत्काळ मार्ग काढण्याचे आदेशही दिले.

महाराष्ट्रासाठीच दिल्लीला जातो

आधीचे सरकार काहीच मागत नव्हते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीच आणले नाही. आता आम्ही दिल्ली महाराष्ट्रासाठी जात असतो. त्यावरदेखील टीका केली जाते. तुम्ही दिल्लीलाच जाता, पण त्यामागचा हेतू कोणी समजूत घेत नसल्याचे सांगत त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला. तसेच आम्ही करणारे असून, घरात बसून निर्णय घेत नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा –