नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारापासून चार हात लांब असलेले सिन्नरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी गुरूवारी (दि.९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत गोडसेंविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. गोडसेंकडून मतदारसंघात हस्तक्षेप केला जात असल्याने त्यांचा प्रचार कशासाठी करायचा, असा सवालच कोकाटेंकडून मुख्यमंत्र्यांना केला गेला. यावर माझ्याकडून बघून प्रचाराला लागा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना केले. मात्र यामुळे समाधान न झाल्याने येत्या दोन दिवसात समर्थकांचा मेळावा घेऊन निर्णय घेण्याची भूमिका कोकाटेंनी जाहीर केली.
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खा. हेमंत गोडसे महायुतीची उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरले असले तरी त्यांच्याविरोधातील नाराजी अद्याप शमलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये येत महायुतीच्या नेत्यांची समन्वय बैठक घेतली असली तरी या बैठकीला छगन भुजबळ यांच्यासह आ. कोकाटेंनी मारलेली दांडी महायुतीतील मनोमिलनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. भुजबळ आणि कोकाटे यांनी नाशिकमध्ये गोडसेंच्या प्रचारापासूनही अंतर राखले आहे. त्यामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी अँड. कोकाटे यांची भेट घेतली. यानंतर त्यांना मनधरणीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घडवून आणली गेली. शिंदे, बोरस्ते आणि कोकाटे यांच्यात झालेल्या बैठकीत कोकाटे यांनी गोडसे यांच्याविषयी तक्रारींचा पाढाच वाचला. गोडसेंकडून आपल्या मतदारसंघात वारंवार हस्तक्षेप केला गेला. समर्थकांना त्रास दिला गेला, अशी तक्रार कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कोकाटे यांची मनधरणी करत गोडसेंकडे नव्हे तर माझ्याकडे बघून महायुतीच्या प्रचाराला लागा, असे आवाहन केले. यावर कोकाटे यांनी येत्या दोन दिवसात समर्थकांची बैठक घेऊन निर्णय कळवू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजते.
खा. गोडसे यांच्याकडून माझ्या मतदारसंघात होणारा हस्तक्षेप व समर्थकांना दिलेल्या त्रासाबाबत मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली आहे. त्यांनी प्रचारात सक्रीय होण्याचे आवाहन केले आहे. येत्या दोन दिवसात समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. – ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर.
हेही वाचा: