नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अठराव्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला असून, उत्तर महाराष्ट्रातील ८ जागांसाठी चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. निवडणुकीत भाजपने त्यांच्या वाटेच्या सहा जागांचे उमेदवार जाहीर करीत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत चर्चेचे भिजत घोंगडे कायम आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक मतदारसंघात एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही, हे उल्लेखनीय आहे.
लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून, देशभरात सात टप्प्यांत, तर महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांत ५ टप्प्यांत मतदान होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात लाेकसभेच्या आठ जागा आहेत. निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच भाजपने त्यांच्या कोट्यातील सहा जागांचे उमेदवार घोषित केले आहेत. त्यामध्ये भाजपने जळगावला धक्कातंत्र वापरले असून उर्वरित रावेर, नंदुरबार, धुळे व नगर या मतदारसंघांत विद्यमानांना पुन्हा एकदा संधी दिली. पण त्याचवेळी महायुतीमधील नाशिक व शिर्डीचा घोळ कायम आहे. नाशिकची जागा आपणच लढणार, अशी शिवगर्जना सेनेने केली आहे. त्यावर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) उमेदवार बदलाबाबत दबावतंत्राचे राजकारण केले जात असल्याने उमेदवारीचा गुंता वाढला आहे. दुसरीकडे मविआतदेखील आठही जागांवरील उमेदवारांच्या नावावरून खल कायम आहे.
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने उमेदवार दिलेल्या सहाही जागांवर भाजपविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. पण त्याचवेळी सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या नाशिकमध्ये युती व आघाडीकडून कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे गुलदस्त्यात आहे. तसेच उर्वरित सात जागांवर मविआ कोणते उमेदवार उभे करणार त्यावर रंगतदार निवडणुकांचे सारे गणित अवलंबून असेल.
भेटीगाठीचे सत्र जोमात
महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे अंतिम झाल्याचे सांगितले जात असले तरी अद्यापही नावांची घोषणा होणे बाकी आहे. नाशिक, रावेरसह अजूनही एखाद्या जागेवर मविआ धक्कातंत्र देऊ शकते, अशी चर्चा आहे. परंतु, या साऱ्या राजकीय घडामोडीत लोकसभेची पायरी चढण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडून अखेरच्या क्षणापर्यंत तिकिटासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यातून इच्छुकांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीचे सत्र जोमात सुरू आहे.
हेही वाचा :
- Nayanthara : नयनताराला चांगले दिवस; ५० सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल ५ कोटींचं मानधन !
- चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या आऊटसोर्सिंगवर भर
The post उत्तर महाराष्ट्राचे चित्र अस्पष्टच! उमेदवारीत भाजपची आघाडी, मविआचे भिजत घोंगडे appeared first on पुढारी.