उत्तर महाराष्ट्रात भाजपचे पाचही उमेदवार घोषित; विरोधकांची चाचपणी सुरूच

राजकीय पक्ष pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात महायुतीने, विशेषत: भाजपने आघाडी घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक वगळता नंदुरबार, जळगाव, रावेर, धुळे, आणि दिंडोरी या पाच मतदारसंघांतील उमेदवार भाजपने आठवडाभरापूर्वीच जाहीर केलेत. भाजपचे उमेदवार कामालाही लागले आहेत. महाविकास आघाडीत मात्र अद्यापही जागावाटपाचा वाद कायम आहे. गुरुवारी (दि.२१) महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक होत असून, या बैठकीनंतर जागावाटप जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याने आघाडीतील इच्छुकांची धडधड वाढली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात १३ व २० मे या दोन टप्प्यांत मतदान होत आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, दिंडोरीसह नंदुरबार, जळगाव, रावेर, धुळे हे सहा मतदारसंघ आहेत. २०१९च्या निवडणुकीत या सहापैकी पाच मतदारसंघ भाजप, तर नाशिकची एक जागा शिवसेनेला मिळाली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ४८ पैकी २० मतदारसंघांमधील उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. त्यात उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या ताब्यातील पाचही मतदारसंघांमधील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत दिंडोरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे आहे. राष्ट्रवादीकडून भास्करराव भगरे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप उमेदवारीची अधिकृत घोषणा होऊ शकलेली नाही. ग्रामीण भाग असल्याने द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची येथे मोठी संख्या आहे. याचा फायदा शरद पवारांच्या उमेदवाराला होईल का, हे आजच सांगणे कठीण आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा आणि धुळे जिल्हा मिळून धुळे लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याचा अंदाज आहे. काँग्रेसचे नाशिक जिल्हाप्रमुख तुषार शेवाळे आणि श्यामकांत सनेर यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. तर भाजपकडून पुन्हा एकदा सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगाव मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याठिकाणी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट भाजपने कापले आहे. मात्र, महाविकास आघाडीत उमेदवारी निश्चितीवर अद्यापही एकमत होऊ शकलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे विकास पवार इच्छुकांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत. तर या जागेसाठी ठाकरे गटदेखील प्रयत्नशील आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे या शरद पवार गटाकडून उमेदवार असतील, अशी शक्यता होती. पण एकनाथ खडसे यांनी स्वत: किंवा रोहिणी खडसे या निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली आहे.

रोहिणी खडसे यांनी विधानसभेची तयारी करत असल्याचे जाहीर केले आहे. आता शरद पवार गट कुणाला उमेदवारी देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नंदुरबार मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा हीना गावित यांना संधी दिली आहे. या मतदारसंघातील काँग्रेसचे माजी मंत्री अॅड. पद‌्माकर वळवी यांनी भाजपत, तर ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने महाविकास आघाडीला याठिकाणी सक्षम उमेदवार मिळू शकलेला नाही.

गोडसेंकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न
नाशिकच्या जागेवर महायुतीतील तीनही घटक पक्षांनी दावा केला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुपुत्र तथा शिंदे गटाचे युवा नेते श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपचा विरोध मावळण्यासाठी गोडसे यांनी मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीत मनसेरूपी चौथा भिडू आल्यानंतर नाशिकच्या जागेवर मनसेकडून दावा केला गेल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेवर ठाकरे गटाने दावा करत विजय करंजकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, गोडसे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर पर्यायी उमेदवाराची चाचपणी महाविकास आघाडीकडून सुरू झाल्याचे समजते. उमेदवारीसाठी गोकुळ पिंगळे, बाळासाहेब वाजे, माणिकराव कोकाटे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र, करंजकर हेच उमेदवार राहतील, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला.

The post उत्तर महाराष्ट्रात भाजपचे पाचही उमेदवार घोषित; विरोधकांची चाचपणी सुरूच appeared first on पुढारी.