साथीचे आजार कायम; महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्पाघात कक्ष सुरू

तापमान pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एप्रिल-मे महिन्याला अद्याप अवकाश असताना मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र बनल्यामुळे शहरात तापाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या अडीच महिन्यांमध्ये तापाचे ३,५२९ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या केवळ महापालिकेतील रुग्णालये व दवाखान्यांमधील आहे. खासगी रुग्णालयाने तापसदृश आजाराच्या रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. दरम्यान, उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्याची तयारी वैद्यकीय विभागाने केली आहे.

कोरोना महामारी नाशिकमधून नामशेष झाली असली तरी डेंग्यू, चिकनगुणिया, स्वाइन फ्लू, मलेरिया तसेच डोळ्यांच्या साथीचे आजार कायम आहेत. गतवर्षी पर्जन्यमान कमी राहिल्यामुळे ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता आतापासून दिसू लागली असून, शहरी भागातही उन्हाचा वाढता कडाका नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरला आहे. बदलत्या हवामानामुळे ताप आणि फ्लूचेही रुग्ण वाढताना दिसत आहेत. पालिकेच्या रुग्णालयांपाठोपाठ शहरातील खासगी रुग्णालयांमध्येदेखील सर्दी, ताप व खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हवामानातही बदल घडत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे.

गेल्या अडीच महिन्यांत तापसदृश आजाराच्या ३,५२९ रुग्णांची नोंद पालिकेच्या रुग्णालयांमध्ये झाली आहे. उष्माघाताचेही रुग्ण आता पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येत आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

डेंग्यू रुग्णसंख्या ५० वर
गतवर्षीप्रमाणे यंदाही डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम राहिला आहे. गेल्या अडीच महिन्यांत शहरात डेंग्यूची ५० जणांना लागण झाली आहे. जानेवारीत २५, फेब्रुवारीत २२ ते १ ते २० मार्चदरम्यान डेंग्यूचे तीन रुग्ण आढळलेत. चिकुनगुणियाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

उष्माघात टाळण्यासाठी हे करा..
* नागरिकांनी दुपारच्या सुमारास घराबाहेर पडताना काळजी घ्यावी
* वयोवृद्ध, लहान मुले, गरोदर स्त्रिया, आजारी लोकांनी शक्यतो उन्हात घराबाहेर पडू नये.
* अंगावर पुरळ आल्याचे दिसताच लगतच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत.
* रस्त्यावरील दूषित बर्फाचे गोळे, शीतपेय टाळावेत.
* लिंबू सरबत, ताकाचे अधिक सेवन करावे.

The post साथीचे आजार कायम; महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्पाघात कक्ष सुरू appeared first on पुढारी.