उत्तर महाराष्ट्रात गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत क्लीन स्वीप करणाऱ्या भाजप युतीला यावेळी महाविकास आघाडीने चांगलाच दणका देत सहापैकी तीन जागा पटकावल्या. दर फेर मतमोजणीमुळे धुळे मतदारसंघाचा निकाल रखडला आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, डॉ. हीना गावित आणि हेमंत गोडसे या विद्यमान सदस्यांना पराभवाचा धका बसला आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, दिंडोरीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे, तर नंदुरबारला काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी विजयी पताका फडकावली. जळगाव आणि रावेरमध्ये अनुक्रमे स्मिता वाघ व रक्षा खडसे यांनी मोठ्या विजयाची नोंद करीत भाजपचे गड सुरक्षित ठेवले. धुळ्यात भाजपचे डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यातील फैसला अद्याप बाकी आहे.
नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर मतदारसंघांत उमेदवारी जाहीर होण्यापासून ते मतदानापर्यंत मोठे औत्सुक्य दिसून आले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने एकसंध शिवसेनेच्या मदतीने सर्व ठिकाणी विक्रमी मताधिक्याने विजयाची नोंद केली होती. यावेळी त्याचीच पुनरावृत्ती करण्याची भाषा महायुती नेत्यांकडून झाली असली, तरी प्रत्यक्षात मतदारांनी समतोल कौल देण्याचा चमत्कार घडवला.
नाशिकमध्ये मशाल पेटली; वाजे विजयी
प्रतिष्ठेच्या नाशिक मतदारसंघातील लढत चौरंगी असली तरी खरे द्वंद्व महायुतीचे हेमंत गोडसे आणि मविआचे राजाभाऊ (पराग) वाजे यांच्यात होते. सलग दोन निवडणुकांत चढ्या मताधिक्याने विजयाची नोंद केलेल्या हेमंत गोडसे यांना हॅट्टिकच्या दृष्टीने शिवसेना शिंदे गटाने मैदानात उतरवले होते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या वाजे यांनी गोडसे यांना जोरदार धक्का देत दिमाखदार विजयाची नोंद केली.
दिंडोरीत भगरे जायंट किलर; डॉ. पवारांना धक्का केंद्रीय मंत्री विरुद्ध माध्यमिक शिक्षक असा सामना पहायला मिळालेल्या दिंडोरी मतदारसंघाकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष होते. या लढतीत भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यावर दखलपात्र मताधिक्याने लीलया मात करून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे जायंट किलर ठरले. उमेदवारी जाहीर झाल्यापासून डॉ. पवार यांच्याबाबत मतदारांची नाराजी अखेरपर्यंत कायम राहिली. विशेषतः कांदा निर्यातबंदी, विकासकामांचा अभाव, तुटलेला जनसंपर्क हे मुद्दे पवार यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.
धुळ्यात काँटे की टक्कर!
सलग दोन विजयांची नोंद केलेल्या डॉ. सुभाष भामरे यांना भाजपने या मतदारसंघात तिसऱ्यांदा चाल दिली. मविआकडे प्रभावी उमेदवार नसल्याने ती माळ नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या डॉ. शोभा बच्छाव यांच्या गळ्यात पडल्यानंतरही त्यांनी कौतुकास्पद लढत दिली आहे. या ठिकाणी प्रारंभी डॉ. भामरे यांच्या विजयाची घोषणा झाली होती. मात्र, डॉ. बच्छाव यांच्याकडून फेर मतमोजणीची मागणी झाल्याने येथील निकाल रखडला आहे.
डॉ. गावितांना धक्का; पाडवींचा मोठा विजय
आदिवासीबहुल नंदुरबार मतदारसंघात तिसऱ्यांदा नशीब आजमावणाऱ्या भाजपच्या डॉ. हीना गावित यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. तुलनेत नवख्या असलेल्या ड. गोवाल पाडवी यांनी काँग्रेसला देदीप्यमान विजय मिळवून दिला. साठ टक्के आदिवासी मतदारसंख्या असलेल्या मतदारसंघात महायुतीने अवघी ताकद लावूनही मतदारांनी पाडवी यांना पसंती दिली. गावित यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर पाडवी यांच्यासाठी प्रियंका गांधी यांनी मोठ्या सभा घेतल्या होत्या. पाडवी यांच्या विजयाने नंदनगरीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
जळगाव भाजपचेच; वाघ विजयी
सलग पंचवीस वर्षे भाजपचे कमळ फुललेल्या जळगावमध्ये ती जादू यावेळीही कायम राहिली. ऐनवेळी तिकीट दिलेल्या स्मिता वाघ यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या करण पवारांना पराभवाची धूळ चाखली. या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कापून वाघ यांना उमेदवारी बहाल केली. त्यानंतर पाटील यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश करून विश्वासू करण पवार यांना उमेदवारी मिळवून दिली होती. तथापि, मतदारांनी अडीच दशकांची भाजपशी जुळलेली नाळ कायम ठेवत वाघ यांना कौल दिला. त्यांच्यासाठी महायुतीच्या गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील या मंत्रीत्रयींची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
रावेरला खडसेंचा एकहाती विजय
लेवा पाटील मतदारांची निर्णायक संख्या असलेल्या रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्या रूपाने भाजपने सलग तिसऱ्यांदा कमळ फुलवले. खडसे यांच्या विरोधात शरद पवारांच्या पक्षाने श्रीराम पाटील यांच्या उमेदवारीतून मराठा कार्ड चालवले; तथापि, ती बाब खडसे यांचा विजयी रथ रोखू शकली नाही. एकतर्फी स्वरूपातील ही लढत रक्षा यांनी तब्बल साडेतीन लाखांहून अधिक मताधिक्याने जिंकली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्नुषा रक्षा यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. शिवाय, महायुतीचे नेते झाडून प्रचारात उतरल्याचे प्रत्यंतर रक्षा यांच्या विजयाने आले. नवख्या श्रीराम पाटील यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा: