नाशिक : पुढारी वृत्तसेवा- माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मोठा ‘इगो’ होता. त्यामुळे ते कधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे चर्चेसाठी गेले नाहीत. आजच्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे वेळोवेळी चर्चेसाठी मोदींकडे जात आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात मोठी विकासकामे होत आहेत, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे.
२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.१२) नाशिकमध्ये आले होते. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बावनकुळे हेही नाशकात तळ ठोकून होते. मोदींच्या स्वागतापूर्वी बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना महायुतीतील शिंदे, फडणवीस, पवारांवर बावनकुळे यांनी स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले की, स्वच्छ सर्वेक्षणात देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या या स्पर्धेत राज्यातील नऊ शहरांचा समावेश आहे. एकत्र राहिल्यामुळेच हे सर्व शक्य झाले, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते रामकुंड येथे जलपूजनही करण्यात आले. त्यामुळे आजचा दिवस खूप चांगला आहे, असे त्यांनी सांगितले. २२ जानेवारीला अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटन होत आहे. हा दिवस आमच्यासाठी दिवाळी आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कुठलीही चर्चा झाली नाही. मोदींकडे अजून महाराष्ट्रासाठी काय मागता येईल? महाराष्ट्राचा अजून काय विकास करता येईल हीच चर्चा तिन्ही नेत्यांमध्ये विमानात झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
हेही वाचा :
- Deolali Cantonment Board : स्वच्छ सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट देशात दूसरे
- Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मोदींना साकडे, पुरोहित संघाने काय केली मागणी?
- ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आणखी ६२ वसतिगृहे
The post उद्धव ठाकरेंच्या 'इगो'मुळे विकास रखडला : बावनकुळे appeared first on पुढारी.