नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या जागेवरून महायुतीतील संघर्ष टोकाला गेला असून, उमेदवारीचा निर्णय आणखी दोन-तीन दिवस लांबण्याची शक्यता आहे. आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी (दि. 2) तिसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर गोडसेंपाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनीदेखील मुंबई गाठली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेदेखील मुंबईला रवाना झाल्याने उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
राज्यातील सहा जागांवरून राज्यातील महायुतीचे जागावाटप रखडले आहे. त्यात नाशिकचाही समावेश असून, नाशिकच्या जागेचा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे. नाशिकच्या जागेचा कौल हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्यापैकी एकाला मिळणार की, अन्य तिसराच पर्याय समोर येणार, याबाबत मंगळवारी दिवसभर मुंबईत बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यानंतर नाशिकची जागा हवी आहे. भुजबळांच्या नावाला स्थानिक पातळीवर विरोध होत आहे. भुजबळ कुटुंबाला हेमंत गोडसे यांनी याआधी दोन वेळा पराभूत केले आहे. जर भुजबळांना उमेदवारी दिली, तर काय परिणाम होईल, याची चाचपणी भाजपकडून केली जात आहे. जातीय समीकरणे आणि भुजबळांच्या नावाला होणारा विरोध पाहता, अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. रविवारी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलेले पदाधिकाऱ्यांचे अभिप्राय भाजपच्या वरिष्ठांना पाठवण्यात आले. या अभिप्रायानंतर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये नाशिकच्या जागेबाबत बैठक झाल्याचे समजते. त्यानंतर मंगळवारी दुपारी गोडसे यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत उमेदवारी आपल्यालाच मिळावी असा आग्रह धरला, तर छगन भुजबळ यांनीदेखील मुंबई गाठल्याने महायुती नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच कायम राहिली आहे. पालकमंत्री भुसे यांनीही यवतमाळचा दौरा ऐनवेळी रद्द करत मुंबई गाठल्याने नाशिकमध्ये चर्चेला उधाण आले होते.
तीन-चार दिवसांत निर्णय: गोडसे
नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीदरम्यान केल्याचे हेमंत गोडसे यांनी सांगितले. २०१४ व २०१९च्या निवडणुकीतील समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्याविरोधातील मताधिक्य मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आले आहे. इलेक्टिव्ह मेरीटवर आपल्यालाच उमेदवारी मिळेल. नाशिकची जागा शिंदे गटाकडेच कायम राहावी, ही शिवसैनिकांची भावना आहे. ती मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली असून, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत ते चर्चा करणार आहेत. येत्या तीन-चार दिवसांत नाशिकच्या उमेदवारीचा निर्णय घोषित केला जाईल, अशी माहिती गोडसे यांनी दिली.
हेही वाचा:
- Loksabha election : वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यातून वसंत मोरे रिंगणात
- Kolhapur News | दैनिक ‘पुढारी’ कार्यालयाला शाहू महाराज यांची भेट
- Lok Sabha Election 2024 : इलेक्शन आलं… महिला आठवल्या
The post उमेदवारी कोणाला : भुजबळ की गोडसे, उत्सुकता शिगेला appeared first on पुढारी.