मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारांची संख्या १६ हून अधिक झाल्याने मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅलेट युनिटची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात ८०८, तर मध्य विधानसभा मतदारसंघात ८२२ बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. सध्या ईव्हीएम मशीन सेटिंगचे कामकाज सुरू आहे. मालेगाव बाह्यमध्ये ३३७, तर मध्यमध्ये ३४३ मतदान केंद्रे आहेत. नोटासह १६ उमेदवार संख्या असल्यास एका बॅलेट युनिटवर मतदान प्रक्रिया घेतली जाते. मात्र, पापेक्षा जास्त उमेदवार संख्येसाठी युनिटची संख्या वाढवावी लागते.
धुळे लोकसभेसाठी उमेदवार संख्या वाढल्यामुळे बॅलेट युनिटची संख्या दुप्पट करावी लागली आहे. १० टक्के राखीव ईव्हीएमसह नियोजन करण्यात आले आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात ८०८ बॅलेट युनिट, ४०४ कंट्रोल युनिट, ४४८ व्हीव्हीपॅट वापरले जातील. मध्य मतदारसंघात केंद्रांची संख्या जास्त असल्याने ८२२ बॅलेट युनिट, ४११ कंट्रोल युनिट व ४४५ व्हीव्हीपॅट लावले जाणार आहेत.
माघारीनंतर उमेदवार संख्येचे चित्र स्पष्ट होताच, बाह्यच्या निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार देवरे व मध्यचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकहून वाढीव बॅलेट युनिट मागविण्यात आले आहेत. सर्व ईव्हीएम मशीन हे शिवाजी जिमखाना व वखार महामंडळ गोदामात कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
ईव्हीएम मशीन सेटिंगसंदर्भात निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सध्या आयोगाच्या निर्देशानुसार रॅन्डमप्रमाणे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट जोडणीने काम सुरू आहे. मंगळवार (दि. १४) मेपर्यंत मशीन सील करून मतदान प्रक्रियेसाठी सज्ज ठेवले जातील.
हेही वाचा: