नाशिक : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर राजकीय वातावरण शांत झाले असताना, उष्णतेचा प्रकोप वाढला आहे. शहरात मंगळवारी (दि. २१) तापमान ४१.८ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले असून, यंदाच्या हंगामातील ते उच्चांकी ठरले आहे. परिणामी, वातावरणातील उष्म्यात वाढ होऊन नागरिक घामाघूम झाले. मालेगावाला ४३ व निफाडमध्ये ४०.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
येथे गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. दिवसेंदिवस पाऱ्यातील वाढ कायम असून, मंगळवारी (दि. 21) किमान तापमानाचा पारा थेट ४२ अंशांच्या जवळपास पोहोचल्यामुळे तीव्र उकाडा जाणवत आहे. सकाळी ११ पासूनच उन्हाचा तडाखा बसत असून, दुपारी २ ते ४ वेळेत त्याची सर्वाधिक तीव्रता होती. उन्हाचा वाढता प्रकोप बघता, शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागू केल्यासारखे चित्र पाहायला मिळाले. उकाड्यापासून बचावासाठी पंखे, कूलर, एसीची मदत घेतली जात होती. परंतु, तेथेही गरम हवाच फेकली जात असल्याने नागरिक अक्षरश: घामाघूम झाले. यापूर्वी गेल्याच महिन्यात दि. १४ ते १९ तारखेदरम्यान तसेच एप्रिलअखेरीस नाशिकला पारा थेट ४० ते ४२ अंशांदरम्यान स्थिरावला हाेता.
उष्णतेच्या लहरीचा परिणाम मालेगावमध्येही झाल्याचे दिसून येत आहे. शहराचा पारा ४३ अंशांवर स्थिरावल्याने मालेगाववासीयांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. दरम्यान, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांत शनिवारपर्यंत उष्मा कायम राहील. या काळात सरासरी किमान तापमान ४० ते ४४ अंशांदरम्यान असेल असा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
निफाडच्या पाऱ्यातही वाढ
द्राक्षपंढरी निफाडचे तापमान ४०.८ अंशांवर पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे निफाडवासीयांना घामाच्या धारा लागल्या आहेत. जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांतही सरासरी तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. एकूणच बदलत्या हवामानाचा परिणाम जनजीवनावर होत आहे.
हेही वाचा: