उद्योजकांचा जोरदार प्रतिसाद : लिलावात दर भडकण्याची भीती

भूखंड pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रदीर्घ काळानंतर दिंडोरी, अक्राळे औद्योगिक वसाहतीतील भूखंड लिलावाद्वारे विक्रीस उपलब्ध केल्याने, त्यास उद्योजकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अवघ्या २७ भूखंडांसाठी तब्बल १९७ अर्ज प्राप्त झाल्याने, भूखंडांचे दर निर्धारित दरांपेक्षा अधिक भडकण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिकपासून अवघ्या काही किलोमीटरवर दिंडोरी, तळेगाव-अक्राळे औद्योगिक वसाहत तब्बल ४५० कोटींहून अधिक खर्च करून उभारण्यात आली आहे. या औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेली जमीन अगोदर वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर हा प्रकल्प रखडत रखडत सुरू झाला. भूसंपादनासाठी तब्बल ३५० ते ४०० कोटी लागले. त्यानंतर पायाभूत सुविधांसाठी ७० कोटी रुपये त्यावर खर्च केला गेला. सद्यस्थितीत या वसाहतीत रस्ते, पथदिवे व पाण्याची सुविधा आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रिलायन्सने तब्बल ४,२०० कोटींची गुंतवणूक या ठिकाणी केली आहे. याशिवाय तब्बल २९ उद्योग या ठिकाणी आल्याने अक्राळे औद्योगिक वसाहतीकडे उद्योजकांचा ओढा वाढला आहे. प्रारंभी अक्राळेतील भूखंड विक्रीच्या तीन वेळा जाहिराती प्रसिद्ध केल्या गेल्या. मात्र, दर अधिक असल्याने उद्योजकांनी त्यास फारसा प्रतिसाद दिला नाही. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडेदेखील दर कमी करण्याबाबत उद्योजकांनी मागणी केली होती. दरम्यान, सन २०२० मध्ये जे दर होते, तेच दर आजही स्थिर ठेवण्यात आले आहेत. याशिवाय औद्योगिक वसाहतीत मोठमोठे उद्योग आल्याने, अक्राळे औद्योगिक वसाहतीचे उद्योजकांसाठी महत्त्व वाढल्याचे दिसून येत आहे.

तीन ते साडेपाच हजार दर?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर २७ भूखंडांची जाहिरात प्रसिद्ध करताना तीन हजार रुपये प्रतिचौरस मीटर हा दर निश्चित केला आहे. लिलाव पद्धतीने या भूखंडांचे वितरण होणार असल्याने मूळ दर थेट साडेपाच हजारांपार जाण्याची शक्यता आहे. एका भूखंडासाठी तब्बल १७ उद्योजकांनी अर्ज केले आहेत. अशात दर भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २७ भूखंडांपैकी १२ भूखंड फूड प्रकल्पांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

लवकरच लिलाव प्रक्रिया
३०००, ११२५, १००० चौरस मीटर आकाराचे भूखंड विक्रीस उपलब्ध करून दिले असून, या भूखंडांचा दर तीन हजार रुपये प्रती चौ. मीटर आकारण्यात आला आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केल्यानंतर लिलावानुसार या भूखंडांची विक्री केली जाईल. ऑनलाइन प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत २ फेब्रुवारी होती. आता लवकरच लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

The post उद्योजकांचा जोरदार प्रतिसाद : लिलावात दर भडकण्याची भीती appeared first on पुढारी.