सभेआडून भुजबळांचा विरोधकांसोबतच स्वकीयांना इशारा

छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटील www.pudhari.news

नाशिक । मिलिंद सजगुरे

मराठा आरक्षणावरून उभ्या महाराष्ट्रात वणवा पेटलेला असताना, त्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या मनोज जरांगे-पाटलांना थेट आव्हान देण्याची भाषा राज्यातील हेविवेट मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ओबीसी मुद्द्यावर कोणत्याही पक्षात असलो, तरी आपला बाणा कायम राहणार असल्याचा इशारा भुजबळ यांनी विरोधकांसोबतच स्वकीयांना दिल्याचा निष्कर्ष यानिमित्त काढण्यात येत आहे. ओबीसींचा मसिहा हे बिरुद अव्याहत ठेवून प्रत्येक राजकीय पक्षाला आपली राज्यस्तरावर दखल घेण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागेल, असा अप्रत्यक्ष संदेशही भुजबळ यांनी जालन्यातील अंबडच्या सभेमधून दिला आहे.

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाच्या चौकटीत बसवण्यासाठी जरांगे-पाटील यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी सकल ओबीसी समाजाने ऐक्याची वज्रमूठ उभारून विरोध केला आहे. एकीकडे मनोज जरांगे-पाटील हे उपोषणापश्चात राज्यभर सभांचा धडाका लावत सरकारसह अनेकांना धडकी भरवत असतानाच त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसी सरसावले आहेत. ओबीसींचे अवघे नेतृत्व अर्थातच भुजबळ यांच्याकडे आले आहे. अंबडस्थित दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेमध्ये उपस्थित सर्वच नेत्यांनी भुजबळ यांना तशी गळ घातली. या सभेमध्ये भुजबळ यांच्यातील सैनिक जागा झाला आणि त्यांनी जरांगे-पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. राज्यस्तरावरील सभा-मेळाव्यांत मराठा आरक्षणाचा जागर करून प्रचंड प्रतिसाद मिळवत असलेल्या जरांगे यांच्यावर शरसंधान करून भुजबळ यांनी खरोखरच मोठे धाडस दाखवल्याचे मानण्यात येत आहे. मराठा आरक्षणाला विरोध न दर्शवता केवळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मुद्द्यावर भुजबळ ठाम आहेत. नमनाच्या सभेमधून भुजबळ यांनी जिल्हानिहाय सभा घेण्याचे निर्देश देत अप्रत्यक्षरीत्या जरांगे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

या सभेच्या माध्यमातून भुजबळ यांनी मोठा जनसमुदाय एकत्रित करून स्वत:च्या राज्यस्तरीय नेतृत्वाची चुणूक विरोधकांना दाखवून दिली आहे. दुसरीकडे बीडमधील जाळपोळ घटनांवरून पोलिसांच्या आडून राज्य सरकारला दूषणे देण्यातही त्यांनी कसूर सोडली नाही. यामधून अप्रत्यक्षरीत्या आपण मंत्रिपदावर असलो, तरी ओबीसींवर झालेला अन्याय कदापि सहन करणार नाही, हा इशारा त्यांनी स्वकीयांना दिला आहे. या सभेमध्ये गोपीचंद पडळकर आणि देवयानी फरांदे या भाजप आमदारद्वयींना भाषणाची संधी देऊन हा पक्षही माझ्यासोबत असल्याचे भुजबळ यांनी स्वपक्षीय नेतृत्वाला दिल्याचे मानण्यात येत आहे.

ओबीसींसाठी व्हिसल ब्लोअरच्या भूमिकेत…

बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत नेतृत्वाची जडणघडण झालेल्या छगन भुजबळ यांची आक्रमक वृत्ती सर्वश्रुत आहे. विधानभवनापासून जाहीर सभांची मैदाने लीलया शब्दफेकीने गाजवण्यात ते वाकबदार असल्यामुळे साहजिकच नव्वदीच्या दशकापर्यंत त्यांचा राज्यभर लौकिक राहिला. मंडल आयोगाला थेट बाळासाहेबांनी विरोध केल्यामुळे भुजबळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसचा रस्ता धरला. पुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही भुजबळ ओबीसी चेहरा म्हणूनच वावरले. किंबहुना, पक्षाला देशभरात स्थान निर्माण होईल, या आशावादाने पवारांनी भुजबळांना उत्तर भारतीय पट्ट्यात ओबीसी मेळाव्यांच्या आयोजनासाठी प्रोत्साहित केले. त्याचा पक्षाला फार लाभ झाला नसला, तरी भुजबळ यांनी स्वनामाची महती अधोरेखित करण्यात यश मिळवले. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये फूट पडली. भुजबळ यांनी सत्तेत सहभागी होऊ पाहणाऱ्या अजित पवार गटाला पसंती देत थोरल्या पवारांची साथ सोडली. मध्यंतरी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी जेलवारी केलेल्या भुजबळ यांचे पक्षातील वजन घटल्याचा त्यांना बहाल करण्यात आलेल्या मंत्रालयावरून निष्कर्ष काढण्यात येत होता. तथापि, त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याचे धाडस ना शरद पवारांनी दाखवले, ना अलीकडील मंत्रिमंडळ जडणघडणीत अजित पवारांनी. राज्याच्या सामाजिक आलेखात ओबीसी प्रवर्गाचे महत्त्व लक्षात घेता, भुजबळ यांनी सातत्याने या घटकासाठी व्हिसल ब्लोअर म्हणूनच भूमिका वठवली.

हेही वाचा :

The post सभेआडून भुजबळांचा विरोधकांसोबतच स्वकीयांना इशारा appeared first on पुढारी.