१० लाखांची खंडणी घेताना मुलासह कृषी अधिकारी जाळ्यात

खंडणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्रात सेवेकरी असलेल्या कृषी अधिकारी महिलेने अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुकुल पीठाच्या विश्वस्ताकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागत एक कोटी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात महिलेसह तिच्या मुलाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेने खंडणी मागितल्याचे विश्वस्त निंबा मोतीराम शिरसाट यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयित महिला कृषी अधिकारी सारिका बापूराव सोनवणे (रा. पाथर्डी फाटा, मूळ रा. देवळा, जि. नाशिक) व त्यांचा मुलगा मोहित बापूराव सोनवणे (२५) यास पोलिसांनी अटक केली आहे.

अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ न्यासाच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य निंबा शिरसाट (५४, मूळ रा. देवळा) यांनी फिर्याद दिली आहे. निंबा शिरसाट हे गंगापूर रोड येथे वास्तव्यास असून, सन २०१४-१५ मध्ये संशयित सारिका या स्वामी समर्थ केंद्रातील विश्वस्तांच्या संपर्कात आल्या. त्यानंतर त्यांच्यावर सिडको परिसरातील बहुतांश स्वामी सेवा केंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली. कालांतराने सारिका यांच्याकडे कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा परिसरातील ४५ समर्थ केंद्रांची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान, सारिका यांचे पती बापूसाहेब यांचे २०१८-१९ मध्ये निधन झाले. त्यामुळे त्यांनी आजारपण, मुलांचे शिक्षण, शेती अशी विविध कारणे सांगून निंबा यांच्याकडून २५ लाख रुपये उसनवार घेतले. तर, याच कालावधीत सारिका यांनी संकल्पसिद्धी नावाची कंपनी सुरू करून ‘पैसे डबल’ करून देण्याचे आमिष दाखवून इतर सेवेकऱ्यांकडून पैसे जमा केले. मात्र, एकाही सेवेकऱ्याचे पैसे परत केले नाहीत. सेवेकऱ्यांचे पैसे परत करण्यासाठी मदत म्हणून निंबा शिरसाट यांनी सारिकास पुन्हा २० लाखांची मदत केली. दरम्यान, जानेवारी २०२२ मध्ये सारिका व मोहित यांनी निंबा यांना गंगापूर रोड येथे बोलावून घेत ‘माझा मुलगा आयटीतज्ज्ञ असून, आम्हाला पैसे न दिल्यास तुमचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून व्हायरल करू’, अशी धमकी देत पैसे मागितले.

जानेवारी २०२३ मध्ये सारिका व मोहित यांनी निंबा यांना प्रशांतनगर समर्थ केंद्रात भेटून त्यांना आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून २० कोटींची मागणी केली. तसेच पैसे दिले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे निंबा यांनी सारिकास नोव्हेंबर २०२३ मध्ये ५० लाख रुपये दिले. काही दिवसांपूर्वी पुन्हा साडेदहा कोटी रुपये मागितले. त्यामुळे मेटाकुटीस आलेल्या निंबा यांनी गंगापूर पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर (दि.१८) पोलिसांनी जेहान सर्कल येथे सापळा रचून सारिका व मोहितला दहा लाख रुपये घेताना ताब्यात घेतले. सारिकाच्या घरातून १० लाख रुपये, एक लॅपटॉप, तीन आयफोन जप्त केले आहेत. या गुन्ह्याचा तपास गुन्हे विभागाच्या पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे करत आहेत.

व्हिडिओची चौकशी करणार

सारिका व मोहित यांच्याकडे कोणते आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत, त्याची चौकशी केली जाणार आहे. व्हिडिओतील सत्यता पडताळून पुढील कारवाई होईल. संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून रोकड, लॅपटॉप, मोबाइल जप्त केले आहेत. संशयितांनी शिरसाट यांच्याकडून एकूण एक कोटी पाच लाख रुपये घेतले आहेत.

-किरणकुमार चव्हाण, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ एक

हेही वाचा :

The post १० लाखांची खंडणी घेताना मुलासह कृषी अधिकारी जाळ्यात appeared first on पुढारी.