एमटीडीसीची पत्रव्यवहार : देवाधर्माच्या गोष्टींकडे बांधकाम विभागाचा कानाडोळा

सप्तश्रृंगी देवी

नाशिक : गौरव जोशी
वणीच्या सप्तश्रृंग गडावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह येथे पंचतारांकीत रिसाॅर्ट ऊभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून हे रिसॉर्ट ऊभारले जाणार आहे. मात्र, प्रकल्पासाठी आवश्यक जागा हस्तांतरणासाठी वारंवार पत्र व्यवहार करुनही बांधकाम विभागाने त्याकडे कानाडोळा करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. त्यामुळे उभारणीपूर्वीच हे रिसॉर्ट वादात अकडले आहे.

साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे पिठ असलेल्या सप्तश्रृंग गडावर लाखो भाविक आई भगवती चरणी नतमस्तक होतात. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशासह देशभरातून येणाऱ्या भाविकांचा त्यामध्ये समावेश आहे. भाविकांच्या सोयीसाठी गडावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाचे रिसॉर्टमध्ये रुपांतरण केले जाणार आहे. एक एकर जागेवरील या प्रकल्पासाठी एमटीडीसीने रस दाखविला आहे. मात्र, रिसाॅर्ट ऊभारण्यापूर्वी सदर जागेचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरण करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी एमटीडीसीने चार ते पाच वेळेस पत्रव्यवहार करुनही बांधकाम विभागाकडुन अपेक्षित प्रतिसाद अद्यापपर्यंत लाभलेला नाही.

एमटीडीसीतर्फे राज्यभरात रिसॉर्टची चेन ऊभारण्यात आली आहे. नाशिक विभागात गंगापूर धरण येथील ग्रेपसिटी पार्क, शिर्डी तसेच भंडारदरा येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहेत. या रिसॉर्टमधून मिळणाऱ्या पंचतारांकीत साेयीसुविधांमुळे पर्यटकांच्या ती पसंतीस उतरली आहेत. त्याच धर्तीवर सप्तश्रृंग गडावर रिसॉर्ट ऊभारले जाणार आहे. पण रिसॉर्टसाठी आवश्यक जमीनीचा ताबा न मिळाल्याने एमटीडीसीच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची फाईल धूळखात पडली आहे.

गडाच्या साैंदर्यात भर पडणार
सप्तश्रृंग गडावर दरवर्षी भक्तांचा राबता वाढतो आहे. त्यामुळे या भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने ८२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. उपलब्ध निधीतून गडाचे सुशोभिकरण व विविध विकासकामे केली जाणार आहे. याच विकासकामांमध्ये एमटीडीसीचे रिसॉर्टची भर पडल्याने गडाचे सौंदर्य वाढणार आहे.

हेही वाचा:

The post एमटीडीसीची पत्रव्यवहार : देवाधर्माच्या गोष्टींकडे बांधकाम विभागाचा कानाडोळा appeared first on पुढारी.