पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणातून माजी सैनिकाचा खून 

माजी सैनिक pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून माजी सैनिकाने पत्नीच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला केला. अशोका मार्गवरील महादेव पार्क इमारतीच्या पार्किंगमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर प्रियकराने त्याच्या भावासह मिळून मारहाण करीत माजी सैनिकाच्या डोक्यात हेल्मेटचे फटके मारून खुन केल्याची घटना रविवारी (दि.१०) रात्री घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात दोघा भावांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मृत माजी सैनिकाविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

कुंदन अरविंद घडे व चेतन अरविंद घडे (दोघे रा. महादेव पार्क सोसायटी, अशोका मार्ग) अशी संशयितांची नावे आहेत. या दोघांनी मिळून अमोल पोपटराव काटे (३८, रा. एकलहरे रोड) यांचा खून केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. उपनगर पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, संशयित कुदंन व अमोल यांच्या पत्नीत अनैतिक संबंध होते. या संबंधांची कुणकुण लागल्यानंतर अमोलने त्यास विरोध केला. रविवारी (दि.१०) रात्री ८.३० च्या सुमारास अमोल हा कुंदनच्या घराजवळ आला. घराजवळ कुंदन येताच अमोलने त्याच्याकडील रिव्हॉल्वरमधून कुंदनच्या दिशेने गोळी झाडली. मात्र निशाना चुकल्याने सावध होत कुंदनने अमोलला प्रतिकार केला. इमारतीच्या पार्किंगमध्ये कुंदन-अमोल यांच्यात हाणामारीत झाली. त्यावेळी कुंदनचा भाऊ चेतन यानेही अमोलला प्रतिकार केला. दोघा भावांनी अमोलला मारहाण करत गंभीर जखमी केले. तसेच हेल्मेटने अमोलच्या डोक्यात एकापाठोपाठ एक वार करत त्यास रक्तबंबाळ केले. मारहाणीत अमोलचा जागीच मृत्यू झाला. तर, कुंदन आणि चेतन जखमी झाले आहेत. कुंदनवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर चेतनला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मि‌ळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, सचिन बारी, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, युनिट दोनचे निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार, उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह पोलिसांचे घटनास्थळी आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तुल, चॉपर, काडतुसाची पुंगळी जप्त केली आहे. अमोल याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

अमोल मानसिक तणावात
अमोलचे शालक संदीप वराडे यांच्या फिर्यादीनुसार, अमोलने नऊ वर्ष जम्मू व लडाख येथे सैन्य दलात सेवा बजावली. पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे त्याने राजीनामा देत नाशिक गाठले. येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ व बँकेच्या कॅश व्हॅनवर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. पत्नीच्या अनैतिक संबंधाला वैतागून अमोलने नोव्हेंबर २०२३ मध्ये विष सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातून तो वाचला होता. चार महिन्यांपासून अमोलची पत्नी माहेरी राहत आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे अमोल मानसिक तणावात होता.

अतिरक्तस्त्रावाने मृत्यू
जिल्हा रुग्णालयात डॉ. श्रावण गायकवाड यांनी अमोलचे शवविच्छेदन केले. त्यात अमोलच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्या. अंतर्गत व बाह्य रक्तस्त्राव अधिक झाल्याने तसेच गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. अमोलच्या शरीरात बंदुकीची गोळी आढळली नाही.

मृत अमोल काटे pudhari.news
मृत अमोल काटे

अमोल विरोधातही गुन्हा
पोलिस तपासात अमोल हा त्याच्याकडील रिव्हॉल्वर व चाकू घेऊन कुंदनच्या घरी गेला होता. त्याने रिव्हाॅल्वरमधून कुंदनच्या दिशेने गोळी झाडली, मात्र निशाना चुकल्याने कुंदन वाचला. त्यानंतर झटापट झाली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अमोल विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणातून माजी सैनिकाचा खून  appeared first on पुढारी.