ओझर नगर परिषद कर्मचाऱ्याचे नियुक्तीसाठी उपोषण

ओझर,www.pudhari.news

ओझर : पुढारी वृत्तसेवा; नगर परिषद कर्मचारी दिनेश मंडलिक यांनी समावेशन प्रक्रियेत घोळ झाल्याचे सांगत नगर परिषद मुख्यालयासमोर अर्धनग्न उपोषण सुरू केले होते. परंतु पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मंडलिक यांनी उपोषण मागे घेतले.

ग्रामपंचायत काळात सेवाज्येष्ठतेनुसार आणि शिपाई पदाकरिता शैक्षणिक आणि सेवाज्येष्ठतेस पात्र असताना आपणास जाणूनबुजून डावलले गेले, असा आरोप दिनेश मंडलिक यांनी केला आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करूनदेखील कोणतेही उत्तर मिळाले नाही म्हणून मंडलिक यांनी उपोषण सुरू केले होते. बुधवारी (दि. ३) रात्री उशिरा ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी मंडलिक यांच्याशी चर्चा केली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून याबाबत चर्चा केली. देशमुख यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी मंडलिक यांच्यासमोर करण्याची ग्वाही दिल्यावर मंडलिक यांनी उपोषण मागे घेतले.

प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना देशमुख म्हणाले की, ओझरला नगर परिषद अस्तित्वात आली आहे. कर्मचारी वर्गाच्या शासकीय पे रोलवरील नियुक्त्या पहिल्या टप्प्यात झाल्या. त्यात विभागनिहाय भरती संख्या, सेवाज्येष्ठता व इतर पूर्तता होऊन काही कर्मचारी शासनाच्या नियमाप्रमाणे नियुक्त झाले आहेत. कुणाच्याही बाबतीत नियमांच्या चौकटीबाहेर काम झालेले नाही. त्यामुळे मंडलिक यांच्या आरोपात तथ्य नाही. इतर कर्मचारीही जे अद्याप नित्य नियुक्त झालेले नाही, ते शासन आदेशाची वाट पाहात आहेत. त्यामुळे समान न्यायानुसार नियुक्त्या झाल्या असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post ओझर नगर परिषद कर्मचाऱ्याचे नियुक्तीसाठी उपोषण appeared first on पुढारी.