युवा महोत्सवाच्या वेळेत बदलासाठी प्रयत्न, मंत्री महाजन घालणार साकडे

गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या १२ तारखेला आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद‌्घाटन सोहळ्याची वेळ बदलण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. महोत्सवाची सकाळची वेळ बदलून सायंकाळी करावी यासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत पंतप्रधान कार्यालयाला साकडे घालण्यात येणार आहे.

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाचा बहुमान नाशिकला मिळाला आहे. राज्य स्तरावरून महोत्सवासाठी जय्यत तयारी केली जात आहे. या सोहळ्याच्या आयोजनाच्या दृष्टीने राज्याच्या क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे यांनी गुरुवारी (दि. ४) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा व पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय युवा महोत्सवात देशभरातील आठ हजार युवक सहभागी होणार आहेत. प्रत्यक्ष कार्यक्रमाला ५० हजार नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा झाली. सोहळ्याच्या ठिकाणचे व्यासपीठ, व्हीव्हीआयपी मार्ग, पंतप्रधानांच्या हॅलिकॉप्टरसाठीचे हॅलिपॅड, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ, आसन व्यवस्था आदींबाबतचा आढावा पार पडला.

पंतप्रधान मोदी यांनी कार्यक्रमासाठी दीड तासांचा अवधी दिला आहे. त्यादृष्टीने कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये 15 मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम असेल. यावेळी राष्ट्रीय पातळीवर ३५० सुवर्णपदकप्राप्त खेळाडू संचलन करणार आहेत. तसेच स्थानिक कलाकार हे महाराष्ट्राची संस्कृती सादर करतील. युवा महोत्सव गीताचे सादरीकरण होणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाची वेळ बदलून ती सायंकाळी केल्यास अधिक चांगल्या पद्धतीने त्याचे सादरीकरण करणे शक्य होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केला. त्यादृष्टीने मंत्री महाजन यांच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधण्यावर एकमत झाले. यावेळी व्यासपीठामागे भव्य एलईडी स्क्रीन उभारण्यात येईल. तसेच कार्यक्रमस्थळी ठिकठिकाणी अशाच पद्धतीच्या स्क्रीन असतील, अशी माहिती दिवसे यांनी दिली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी हजर होते.

लोगोचे आज अनावरण

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी तयार केलेल्या लोगाचे अनावरण शुक्रवारी (दि. ५) मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे हे दूरदृष्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी होतील. नाशिकमधून पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा :

The post युवा महोत्सवाच्या वेळेत बदलासाठी प्रयत्न, मंत्री महाजन घालणार साकडे appeared first on पुढारी.