ओझर विमानतळावरून वर्षभरात सव्वादोन लाख प्रवाशांची हवाई सफर 

विमान सेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या ओझर विमानतळावरून मागील वर्षी तब्बल सव्वादोन लाख प्रवाशांनी हवाई सफर केल्याची आकडेवारी समोर येत आहे. दरमहा १९ हजार, तर दररोज सुमारे सव्वासहाशे व्यक्ती नाशिक येथून विमानप्रवास करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व फ्लाइट्स ८५ टक्के फुल्ल होत असल्याने, नाशिकमधील विमानसेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. (Nashik Ozar Airport )

ओझर येथून सन २०२३ च्या जानेवारी ते १४ मार्च या कालावधीत स्पाइस जेट या एकमेव कंपनीच्या नवी दिल्ली व हैदराबाद अशा दोन फ्लाइट्स सुरू होत्या. शेवटच्या टप्प्यात ही सेवाही बंद पडली. त्यानंतर १५ मार्च रोजी ‘इंडिगो’ची सेवा सुरू झाली. सुरुवातीला दोन शहरांसाठी सेवा दिली जात होती. मे मध्ये सेवेचा विस्तार करण्यात आला. सध्या ‘इंडिगो’च्या अहमदाबाद (दोन फ्लाइट्स), नागपूर, गोवा, हैदराबाद व इंदूर या शहरांसाठी सेवा सुरू असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात ‘स्पाइस जेट’ची केवळ नवी दिल्ली व हैदराबाद अशा दोन शहरांसाठीच सेवा सुरू होती. या महिन्यात १३ हजार ६२६ प्रवाशांनी, तर फेब्रुवारीमध्ये १२ हजार २७३ जणांनी ये-जा केली. १५ मार्चपासून ‘इंडिगो’ने सेवा सुरू केली. या महिन्यात १४ हजार २४ प्रवाशांनी प्रवास केला. एप्रिलमध्ये नवी दिल्लीसह अहमदाबाद, नागपूर, गोव्यासह बेंगळुरू येथील एका फ्लाइटचे नाशिक विमानतळावरून आगमन व प्रस्थान झाले. या महिन्यात १५ हजार ३११ प्रवाशांनी विमान प्रवास केला. मे महिन्यात १४ हजार २१८, तर जून महिन्यात २० हजार ५९९ जणांनी नाशिक येथून विमानाने ये-जा केली. (Nashik Ozar Airport )

पुढील सहा महिने हेच प्रमाण कायम राहिले आहे. त्यानुसार जुलैमध्ये २० हजार २१२, ऑगस्टमध्ये २० हजार ८३, सप्टेंबरमध्ये १९ हजार ७९९, ऑक्टोबरमध्ये २० हजार ९०४, नोव्हेंबरमध्ये २० हजार ३७५, तर डिसेंबर महिन्यात सर्वाधिक २४ हजार २९३ प्रवाशांनी प्रवास केला आहे. नाशिकच्या विमानसेवेसाठी हे आशादायी चित्र म्हणावे लागेल.

सुट्टीच्या महिन्यात आलेख उंचावला (Nashik Ozar Airport)

सुट्टीच्या महिन्यांमध्ये विमान प्रवासाचा आलेख उंचावत असल्याचे आकडेवारीवरून समोर येते. जून महिन्यापासून ‘इंडिगो’ने विमानसेवेचा विस्तार केला. त्यानंतर प्रवाशांची संख्या २० ते २४ हजारांदरम्यान राहिली. मे हा सुट्टीचा महिना असल्याने गर्दी होती. त्यामुळे मे ते डिसेंबर या आठ महिन्यांतील प्रवाशांची सरासरी दरमहा २१ हजारांवर, तर दररोज सातशेवर जाते. गेल्या जानेवारी महिन्यात ओझर येथून १३ हजार ६२६ जणांनी प्रवास केला होता. डिसेंबरमध्ये हा आकडा तब्बल अकरा हजारांनी वाढल्याचे दिसते.

नाशिकमधून विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नवी दिल्ली व बेंगळुरूसाठी सेवा सुरू झाल्यास सध्याचा दर महिन्याचा २४ हजार प्रवाशांचा आकडा ४५ ते ४८ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. – मनीष रावल, प्रमुख, निमा व आयमा एव्हिएशन कमिटी

हेही वाचा :

 

The post ओझर विमानतळावरून वर्षभरात सव्वादोन लाख प्रवाशांची हवाई सफर  appeared first on पुढारी.