ओसाड माळरानावर आरोग्यदायी ड्रॅगन; इगतपुरीतील पहिलाच प्रयोग

ड्रॅगन pudhari.news

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यात बेलगाव तर्‍हाळे येथील शेतकरी रमेश कड, रमेश जगदाळे या मित्रांनी एकत्र येत ओसाड माळरानावर एक एकरमध्ये आरोग्यदायी ड्रॅगन शेतीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे. त्यांनी सोलापूरचे शेतकरी अनिल साळुंके यांच्याकडून ड्रॅगनची रोपे घेऊन दहा बाय दहाचे अंतर ठेवून लागवड केली आहे. या शेतीला चांगले वातावरण भेटले तर एक ते दीड वर्षात फळ काढणीला येते.

ड्रॅगन शेतीचा ट्रेली सिस्टीममध्ये ६ हजार दोनशे झाडे लावली असून, तालुक्यात हा पहिला प्रयोग आहे. जँबो रेड व्हाईट, स्मॉल रेड, व्हाईट अशी व्हरायटी आहे. ट्रेली सिस्टीममधून एका पोलवर, प्लेट (रिंगवर) चार झाडे लागवड केली आहेत. यामध्ये दीड फूट अंतरावर बांबूला २ रोपे लावली जातात. कड, जगदाळे यांनी हा प्रयोग युट्युबद्वारे जाणून घेतला. या शेतीला पाणी कमी लागते, कोणताही रोग उद्भवत नाही, औषध फवारणीचीही गरज भासत नाही, नैसर्गिक खते वापरतात. तसेच २५ वर्षे लागवड करण्याची गरज भासत नाही.

शेतीला एस सिटी कंपनीचे प्रॉडक्ट वापरतात. ड्रॅगनची उंची आठ फूट झाली आहे. साधारण मे महिन्यात फुलधारणा होण्यास सुरुवात होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. छाटलेले कोवळे फुटवे कुटी करून वाळवल्यांतर खतांचा योग्य वापर करू शकतो, असे शेतकर्‍यांनी सांगितले. पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, कृषी सहाययक रमेश वाडेकर, रूपाली बिडवे यांचेही शेतकर्‍यांना मार्गदर्शन मिळत असते.

सध्या इगतपुरीचे वातावरण ड्रॅगनला पोषक असल्याचे जगदाळे म्हणाले. शासनाने दखल घेऊन ड्रॅगन शेतीसाठी अनुदान देण्याची मागणी  त्यांनी केली. ड्रॅगन फळामुळे रक्तवाढ, पांढर्‍या पेशींचे प्रमाण वाढते, पचनक्रिया सुधारत असल्याने बाजारात या फळाला प्रचंड मागणी आहे. डॉक्टरदेखील हे फळ खाण्यासाठी रुग्णाला सांगतात.

पारंपरिक शेतीतून उत्पन्न कमी मिळत होते. या नवीन प्रयोगातून पहिल्या वर्षी २० ते २५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. रोजगारासाठी अनेक तरुण भटकंती करीत असतात. त्यांना नोकरी मिळत नाही. तरुणांनी शेतीकडे वळावे. शेतीतून रोजगार मिळवून देण्यासाठी
प्रयत्न करणार. – रमेश जगदाळे, शेतकरी.

हेही वाचा:

The post ओसाड माळरानावर आरोग्यदायी ड्रॅगन; इगतपुरीतील पहिलाच प्रयोग appeared first on पुढारी.