नाशिकच्या जागेसाठी भुजबळ आग्रही, अजित पवारांकडे मागणी

छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर जसजसे उमेदवार निश्चित करण्याची वेळ येत आहे, तसतसे महायुती, महाविकास आघाडीमध्ये उमेदवार देण्यावरून मागण्या वाढत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मित्रपक्षांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यानुसार नव्या उमेदवारासाठी चाचपणी सुरू करण्यात आली असल्याने भाजपसह राष्ट्रवादीनेही मागणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजब‌ळ यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये काय घडते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शनिवारी (दि. २३) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर देवगिरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

या बैठकीत भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी अजित पवारांकडे केली आहे. नाशिक हा भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भुजबळ यांनी नाशिक लोकसभेची आग्रही मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात हेमंत गोडसे हेच नाशिकच्या जागेवर उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. यामुळे महायुतीच्या इच्छुकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले होते. याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचीदेखील भेट घेतली होती.

मनसेच्या भूमिकेने इच्छुकांमध्ये चिंता

या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर मनसे महायुतीत सामील होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मनसेकडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आल्याने नाशिकच्या महायुतीच्या इच्छुकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ही जागा मनसे, राष्ट्रवादी अजित पवार गट की, शिवसेना शिंदे गटाला मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post नाशिकच्या जागेसाठी भुजबळ आग्रही, अजित पवारांकडे मागणी appeared first on पुढारी.