कंपनीतील साहित्याची परस्पर विक्री करून विवाहीतेचा पतीला गंडा

Fraud News

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – एका महिलेने माहेरच्या नातलगांसोबत मिळून पतीच्या कंपनीतील सर्व साहित्य परस्पर विकून व व्यवसायातील नफा स्वत:कडे ठेवून पतीस सुमारे एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात विवाहितेसह इतर तिघांविरोधात फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन हरीभाऊ बीडकर (४८, रा. कल्याण, वेस्ट) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी २३ मे २०१४ ते ८ जून २०२२ या कालावधीत फसवणूक केली. सचीन यांच्या पत्नी अश्विनी बीडकर यांनी रेखा सुरेश मुंजवाळकर, विवेक सुरेश मुंजवाळकर व रोशन सुरेश मुंजवाळकर (सर्व रा. बेाधलेनगर) यांच्यासोबत कट रचून फसवणूक केली. सचिन यांनी विश्वासाने पत्नी अश्विनी हिच्याकडे कंपनीची जबाबदारी सोपवली. कंपनीतून मिळणारा ८० टक्के नफा सचिन यांच्या नावे तर २० टक्के नफा अश्विनीच्या नावे होता. कामानिमित्त सचिन बीडकर हे कायम बाहेर राहत असल्याने कंपनीचे सर्व व्यवहार अश्विनी बघत होत्या. मात्र या कालावधीत संशयितांसह मिळून अश्विनीने कंपनीतील सर्व साहित्याची विक्री केली. तसेच कार व व्यवसायात झालेल्या नफ्याचा वाटा स्वत:कडे ठेवून फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सचिन यांनी सातपूर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार सातपूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा: