बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण, 20 लाखांची मागणी

अपहरण,

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा- नाशिक-पुणे महामार्गालगत येथील उद्योग भवन परिसरातील प्रकाशनगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचे सहा संशयितांनी घरात घुसून बंदूक व चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याची घटना सोमवारी (दि.27) रात्री 11 च्या सुमारास घडली. त्यानंतर संशयितांनी मुलाच्या कुटुंबियांकडे 20 लाखांची खंडणी मागून मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, सिन्नर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत दोन संशयितांच्या मुस्नया आवळल्या. त्यांच्या ताब्यातून अपहृत मुलाची सुटका केली. जाफर सलिम मोमीन (24, शंकर नगर, सिन्नर), साहील ज्ञानेश्वर तायडे (20, रा. कानडी मळा, सिन्नर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. एक विधीसंघर्षग्रस्त बालकालादेखील ताब्यात घेतले आहे.

अर्जुन जोगिंदर गुप्ता (रा. उत्तर प्रदेश, 17 वर्षे 10 महिने) याचे आई वडील माळेगाव येथे एका खासगी कारखान्यात काम करतात. अर्जुन याने अभ्यासासाठी प्रकाशनगर येथे खोली भाड्याने घेतली होती. त्याचा गावाकडील मित्र करण चक्रधारी (22) सोमवारी रात्री अभ्यासासाठी आला होता. त्यादरम्यान सहा संशयितांनी खोलीत शिरुन दोघांना बंदुक व चाकुचा धाक दाखवत मारहाण केली. करण व अर्जुनचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडास चिकट टेप गुंडाळला. आरोपींनी करणला रुममधील बाथरुममध्ये कोंडून अर्जुनला तेथून पळवून नेले. त्यानंतर आरोपींनी अर्जुनच्या मोबाईलवरुन त्याच्या मोठ्या भावाशी संपर्क साधला. 20 लाख खंडणीची मागणी केली. ‘पैसे द्या नाहीतर तुझ्या भावाला मारुन टाकू’, अशी धमकीही दिली. अर्जूनच्या कुटुंबियांनी तत्काळ सिन्नर पोलीस ठाण्यास कळविले. पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली. त्यावेळी अर्जूनचा मित्र करण बाथरुममध्ये आढळून आला. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी विशेष पथक तयार करुन अर्जुनच्या जवळच्या मित्रांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

संशयितांपैकी एक असलेल्या मित्राला विश्वासात घेतल्यानंतर अपहरणाचा उलगडा झाला. हवालदार नवनाथ पवार, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, मंगलसिंग सोनवणे यांनी तत्काळ मुसळगाव परिसरातील शंकरनगर गाठले. पोलिसांनी गोडावून गाठले. मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग सुरु करत शटरचे लॉक तोडून गोडाऊनमध्ये प्रवेश केला. आतमध्ये अर्जुनला हातपाय बांधून व त्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबून डोक्यापासून ते गळ्यापर्यंत चिकट पट्टीने पॅक केलेले दिसून आले. पोलीसांनी त्याची सुटका केली. अर्जूनला उपचारासाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. संशयितांच्या साथीदारांचा शोध सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक पल्लवी डोके पुढील तपास करीत आहेत.

अन् ‘करण-अर्जुन’ची सुटका झाली
अर्जूनसोबत नेहमी असणारे मित्र निखिलेश रनजित रावत व अनिस रईस मोहम्मद हे दोघे सायंकाळपासून घरी नसल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी निखिलेशचा शोध घेऊन त्यास विचारपूस केली. मात्र, सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेवून त्याच्याकडून सविस्तर माहीती घेतल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. गौरव चौधरी, जाफर सलिम मोमीन (24, शंकर नगर, सिन्नर), साहील ज्ञानेश्वर तायडे (20, रा. कानडी मळा, सिन्नर), अनिस मोहम्मद, गौरव चौधरी व निखिलेश यांनी अर्जुनला शंकरनगर परीसरात जाफर मोमीन याच्या भंगारच्या गोडावूनमध्ये ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

The post बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण, 20 लाखांची मागणी appeared first on पुढारी.