कब्रस्तानसाठी मुस्लीम ब्रिगेडचे मनपासमोर ‘कफन ओढो’

कफन ओढो आंदोेलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दफनभूमीसाठी नाशिक शहर विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या नानावली व वडाळा शिवारातील आरक्षित जागा संपादित करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राजीव गांधी भवनसमोर बुधवारी (दि.३) ‘कफन ओढो’ आंदोलन करत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, वडाळा शिवारातील आरक्षित जागेच्या संपादनाची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी लेखी पुराव्यासह दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरातील मुस्लीम समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत दफनभूमी अर्थात कब्रस्तानच्या जागा अपुऱ्या पडत आहेत. मृतदेहांवर दफनविधीसाठी जागाच उपलब्ध न राहिल्याने मूलभूत समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शहर विकास आराखड्यात नानावली शिवारातील सर्व्हे क्रमांक ४०६, ४०७ व वडाळा शिवारातील सर्व्हे क्रमांक ६३, ६४, ६५ या जागा मुस्लीम समाजाच्या दफनभूमीसाठी आरक्षित आहेत. या आरक्षित जागा मुस्लीम समाजाला उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गेल्या काही वर्षांपासून समाजाचा पाठपुरावा सुरू आहे. परंतु, प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. उलट नानावली शिवारातील आरक्षित जागा बिल्डरच्या घशात घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

वडाळा शिवारातील आरक्षित जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रद्द करण्यात आली. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सदर जागेच्या संपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु, त्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर अद्याप कुठलीही हालचाल झालेली नाही. यासंदर्भात नगररचना व भूसंपादन विभागातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद दिसत असल्याने कफन परिधान करून आंदोलन करण्यात आले. दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारादेखील मुस्लीम ब्रिगेडने दिला आहे. या आंदोलनात ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजिज पठाण, नदिम मनियार, मुख्तार शेख, मुश्ताक शेख, इब्राहिम अत्तार, फरिद शेख, शेरूभाई मोमीन, निसार शेख, दिनकर गायकवाड, सादिक मोमिन, रफिक शेख, रियाज मेमन, अन्वर पिरजादा आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा :

The post कब्रस्तानसाठी मुस्लीम ब्रिगेडचे मनपासमोर 'कफन ओढो' appeared first on पुढारी.