घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी (दि. १८) पहाटे जबरी रस्ता लुटीचे थरारनाट्य घडले. लुटारूंनी कुरियर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सोन्याची बिस्किटे, दागिने असा तब्बल तीन कोटी ६७ लाख रुपयांचा ऐवज पळविला. माणिकखांब-मुंढेगाव शिवारात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, घोटी पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी चोरट्यांच्या मागावर आहेत.
गोपालकुमार अशोक कुमार (२०, रा. धुरा, ता. किरावली जि. आग्रा) या कुरियर बॉयने फिर्याद दिली आहे. कालबादेवी येथील जयबजरंग कुरीयर सर्व्हिस ही फर्म नाशिक, धुळे व जळगावमधील सोनारांना सोने, चांदीची बिस्कीटे पोहोचविण्याचे काम करते. त्यानुसार गोपाल तिघा सहकाऱ्यांसमवेत नाशिकला निघाला हाेता. घोटी टोलनाका सोडल्यानंतर माणिकखांब शिवारात पोहाेचले असता त्यांच्या इको कारला (एमएच १२, युजे ७९४८) पुढून-मागून दोन वाहनांनी घेरत रोखले. चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या पाच ते सहा जणांनी लाकडी व लोखंडी रॉडचा धाक दाखवत काही क्षणात चालक बबलू उर्फ योगेंद्रकुमार व आकाश तोमर यांना बाहेर खेचत सर्वांच्या डोळ्यात डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर त्यांच्याच वाहनात बसून मुंढेगावजवळील एका ढाब्यावर आले. तोपर्यंत वाहनातील तील एक किलो १०० ग्रॅम वजनाचे ११ सोन्याची बिस्किटे, तीन किलो चारशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ९० किलो वजनाच्या चांदीच्या तीन विटा, ४५ किलो वजनाचे चांदीचे दागिने व एक मोबाइल असा एकूण तब्बल तीन कोटी ६७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी ताब्यात घेतला आणि नंतर नाशिकच्या दिशेने धूम ठोकली. तिघांनी स्वत:ला सावरत योगेंद्रच्या मोबाईलवरुन कुरियर मालक प्रेमसिंग यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती देण्यात आली. सिंग घटनास्थळी आल्यानंतर घोटी पोलिस ठाणे गाठण्यात येऊन फिर्याद नोंदवण्यात आली. पोलिसांनी तातडीने परिसरातील महामार्ग व आजूबाजूला जाणाऱ्या सर्व हॉटेल व रस्त्यांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करीत गुन्हेगारांचा मागोवा काढण्याचा प्रयत्न केला. तपासासाठी पथके रवाना करण्यात आली. विभागीय पोलिस अधिकारी सुनील भामरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. पंचांसमक्ष पोलिसांनी घटनास्थळ पाहणी करीत पंचनामा केला आहे. पोलिस निरीक्षक विनोद पाटील हे तपास करीत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून मुंढेगाव परिसरात चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. मार्गांवरील विजेचे बंद पडलेले व नादुरुस्त हायमास्ट तसेच निर्जन वस्ती परिसरातच चोरटे नागरिकांना लक्ष करत आहेत.
हेही वाचा :
- सरसकट प्रतिनियुक्ती भोवली; संचालक महेश वरुडकरांची उचलबांगडी
- MPSC मुख्य परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; कोल्हापुरातील मुदाळ येथील विनायक पाटील राज्यात प्रथम
- जैवविविधतेचे जतन संवर्धन ही काळाची गरज : सुधीर मुनगंटीवार
The post कुरियर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पावणेचार कोटींची लूट appeared first on पुढारी.