कॅफेचालकाला धमकावत दरमहा पैसे घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कारवाई न करण्याच्या मोबदल्यात कॅफे चालकाकाडून दरमहा दोन ते तीन हजार रुपयांची मागणी करून ती घेणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षकास न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड) असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोसावी याच्या घराची झडती घेतली असता त्यात काहीही आढळून आले नाही.

गोसावी हा विशेष शाखेत कार्यरत असतानाही त्याने नियमभंग करुन एका कॅफे चालकास धमकावत दरमहा पैसे देण्यास जबरदस्ती केली. कॅफे चालकाच्या तक्रारीनुसार त्याच्या कॅफेत जोडप्यांना आडोसा मिळण्यासाठी त्याने कॅफेत काही बदल केले होते. ही बाब गोसावी यास समजल्यानंतर त्याने कॅफेचालकाशी संपर्क साधून ‘ तु कुंटणखाना चालवितोस, तुझ्यावर कारवाई करेन’ असा दम दिला. तसेच कारवाई न करण्याच्या मोबदल्यात त्याने कॅफे चालकाकडून दरमहा तीन हजार रुपयांची मागणी केली. मात्र कॅफेचालक या मागणीने त्रस्त झाल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाने सापळा रचून गोसावी यास लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोसावी यास अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यास शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गोसावी याने तीन महिन्यांपासून दरमहा पैसे घेतल्याची कबुली दिली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसावी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यास निलंबित करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

The post कॅफेचालकाला धमकावत दरमहा पैसे घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास कोठडी appeared first on पुढारी.