गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे

अनिल गोटे

धुळे : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात ठाकरे विरूध्द ठाकरे, मुंडे विरूध्द मुंडे, पवार विरूध्द पवार, निंबाळकरांच्याविरूध्द निंबाळकर, भोसलें विरूध्द भोसले अशा पद्धतीने भाजपाच्या गुजराथ धार्जीन्या नेत्यांनी मराठी नेत्यांनाच एकामेकाविरूध्द लढवून महाराष्ट्राची वाट लावली अशी टीका आज माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.

महाराष्ट्र आणि देशातील राजकारणा संदर्भात धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर कठोर शब्दात टीका केली आहे. गुजरात धार्जीन्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठरवून योजनाबध्द कट-कारस्थान करून महाराष्ट्राच्याच नव्हे तर, देशाच्या राजकारणात दबदबा असलेली मूलतः जन्माने मराठी असलेल्या नेत्यांची आघाडीची घराणी बेमालूमपणे संपवून टाकली आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ या वृत्तीने गोऱ्या कातडीच्या इंग्रजांनी १५० वर्ष देशाला गुलामगिरीत सडवले. गोऱ्या इंग्रजां प्रमाणेच सध्या राज्यात आणि देशात राजकारण सुरू आहे. असा आरोप देखील गोटे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणांत सर्वात मोठे राजकीय घराणे असलेले हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेचें घराणे फोडले. आता महाराष्ट्राच्या येत्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे, शरद पवार, ओबीसींचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भोसले, शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांचा वारसा असलेले निंबाळकर घराणे, अशी आपापसात लढत झालीच पाहिजे. अशी कुटील निती भाजपच्या अश्रीत गुजराथ समर्थक नेत्यांनी अवलंबली आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीत मुंडे विरूध्द मुंडे, लढवून स्व. गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे विरूध्द, मुंडे साहेबांचे सख्खे पुतणे धनंजय मुंडे यांच्यामध्ये लढत लावली. एवढेच नव्हे तर भाजपमधील जातीय नेत्यांनी मुंडेना आर्थिक पाठबळही मिळवून दिले. २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना ” सत्तेतून नव्हे तर, देशातून हाकलून दिले पाहिजे” अशी वल्गणा करणारे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी केली. ‘आम्ही राजकारण सोडून देवू पण, नात्यात अंतर येवू देणार नाही. असे सांगणाऱ्या हिंदूहृद्यसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवंतपणीच ठाकरे विरूध्द ठाकरे, अशी लढत लावून, ठाकरेंच्या घराण्यात सत्तासंघर्ष निर्माण केला. समस्त मराठा समाजाला अभिमान आणि गर्व वाटावा, असे महाराष्ट्राचे सुपुत्र शरद पवार यांच्या हयातीतच त्यांचे पुतणे अजित पवार यांना त्यांच्याविरूध्द लढाईत उतरवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले त्यांचे चुलत भाऊ शिवेंद्रराजे भोसले यांच्यात घरातच साताऱ्यामध्ये भांडण लावले. संभाजी राजेंच्या मातोश्री सईबाई निंबाळकर यांच्या घराण्यात निंबाळकर विरूध्द निंबाळकर तर, अकलूज मधील मोहिते घराण्यात मोहिते विरूध्द मोहिते असा संघर्ष जन्माला घातला. गुजराथ धार्जीन्या भाजपने महाराष्ट्रातील बहुजन समाज कुंटूबांची अक्षरशः वाताहत लावली आहे. आश्चर्य असे की, सत्तेची सर्व पदे भोगलेल्या कॉग्रेसी नेत्यांना भाजपचे उच्चवर्णीय नेते आपल्या कुटूंबाची कशी वाट लावत आहेत हे कळत असूनही ते पुन्हा त्यांच्याच गळाला लागत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आतापुरते एवढेच ठिक आहे. असा टोला देखील गोटे यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या आंदोलनावर टीका

धुळे शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट) च्या आंदोलनाबद्दल आपले मत व्यक्त करतांना गोटे पुढे म्हणाले की, भाजपाच्या लाचार, लाभार्थी, आणि अश्रीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या अर्धशिक्षीत व गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांनी सुरू केलेले आंदोलन अजिबात थांबवू नये. आपण काम करत रहावे. प्रसिध्दीच्या लोभात पडू नये, यासाठी फारसा प्रयत्न न करता मी काम करीत असतो. याची धुळेकर जनतेला पुरेपुर कल्पना आहे. पण महाराष्ट्रात कुठेही नसतील एवढे चांगले विरोधक माझ्या वाट्याला आलेले आहेत. याबाबतीत मी भाग्यवानच आहे. केंद्र सरकारच्या सी.आर.एफ. फंडातून सुरू असलेल्या ‘नव्या रस्त्यांच्या निर्मितीचा कार्यकम’ धुळेकर जनतेला फारसा माहित नव्हता, धुळेकरांपर्यंत पोहचविण्यात आम्ही कमी पडलो. शहरातील दोन टक्के लोकांना सुध्दा पांझरा नदीवरील या निधीतून बांधलेला नवा पुल, शेतकऱ्यांची जमिन, महानगपालिकाचा कचरा डेपो, कृषी महाविद्यालयाच्या जागेतून पारोळा रोडला शेतकरी पुतळ्याला मिळतो. म्हणजे नगांव बारी जवळ राहणारी व्यक्ती केवळ १० मिनीटात रेल्वे स्टेशनला पोहचेल. इतक्या जवळचा रस्ता होत असूनही सामान्य जनता अनेभिज्ञ होती. पण अर्धवट अर्धशिक्षीत नेत्यांनी आंदोलन करून या रस्त्याची माहिती त्यांच्या पैशाने सबंध धुळे जिल्ह्यातील जनतेला कळवून दिली. असा टोला राष्ट्रवादीला गोटे यांनी लगावला आहे.

हेही वाचा –

The post गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे appeared first on पुढारी.