‘केबीसी’ मायाजालाच्या सुत्रधारावर महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही गुन्हे

भाऊसाहेब चव्हाण pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केबीसी कंपनीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण याच्याकडील ८४.२४ कोटी रुपयांच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे. यासंदर्भात ईडीने गुरुवारी (दि.२१) माहिती दिली. मनी लॉडंरींग प्रतिबंधक कायद्यानुसार केलेल्या कारवाईत या मालमत्ता नाशिक जिल्ह्यासह ठाणे, सिंधुदुर्गसह राजस्थान राज्यात आहेत.

भाऊसाहेब चव्हाण याने केबीसी मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या माध्यमातून मल्टीलेव्हल मार्केटींग योजना राबवून राज्यासह परराज्यातील गुंतवणूकदारांना २०० कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी चव्हाणसह इतरांविरोधात महाराष्ट्रासह राजस्थान राज्यात गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार स्थानिक पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखांनी तपास करीत चव्हाणसह केबीसी कंपनीच्या ८० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. तसेच मालमत्तांचे खरेदी-विक्री व्यवहार थांबवलेले आहेत. तसेच या गुन्ह्यातील मुख्य संशयित भाऊसाहेब चव्हाण हा अद्याप कारागृहात आहे. चव्हाण व इतरांविरोधात ११ जुलै २०१४ रोजी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हजारो गुंतवणूकदारांनी केबीसी कंपनीच्या संचालक व एजंट विरोधात फिर्यादी दिल्या. त्यानुसार गुंतवणूकदारांची २१२ कोटी १८ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. त्यानंतर सखोल तपासात हा आकडा १ हजार कोटींपर्यंत गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज्यात १३ हून अधिक गुन्हे तर परराज्यातही गुन्हे दाखल असून पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. दरम्यान, घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता या गुन्ह्याचा तपास सक्तवसुली संंचलनालयामार्फत सुरु झाला आहे.

विविध खात्यांचा आढावा
नाशिकसह, परभणी व राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांनुसार सक्तवसुली संचलनालयाने तपास सुरु केला आहे. संशयित भाऊसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण व इतरांकडील मालमत्तेची चौकशी केली जात आहे. डीमॅट खाती, पोस्ट ऑफिस बचत खाते, दागिने, बँक खात्यांतील शिल्लक याचाही ईडीने आढावा घेतला आहे. यात कंपनीच्या संचालक व मुख्य एजंटांसह चव्हाण कुटुंबीयांनी संगनमत करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

केबीसीच्या नावे चालवल्या जाणाऱ्या एमएलएम (मल्टीलेव्हल मार्केटिंग) योजनेद्वारे लोकांना आकर्षित करण्याचा कट रचण्यात आला. केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स केबीसी क्लब आणि रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन दिले आहे. यात गुंतवणूकदार व एजंट यांना नफा, कमिशन, पुरस्कार, बक्षीसे आणि उत्पादन भेटवस्तूंचे आश्वासन देण्यात आले होते.

७५६ एजंटांची चौकशी
कंपनीच्या संचालक व महत्वाच्या एजंट यांनी गुंतवणूकदारांकडून आलेल्या पैशांमधून स्वत:साठी स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केल्याचे ईडी तपासात उघड झाले आहे. याबाबत ईडीने कारागृहात असलेल्या संशयितांसह कंपनीच्या सुमारे ७५६ एजंटांकडे चौकशी केल्याचे समजते. त्यामुळे मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदानुसार कारवाई केली. त्यात नाशिक ठाणे येथील ११ स्थावर व जंगम मालमत्ता ईडीने ताब्यात ठेवल्या आहेत.

हेही वाचा:

The post ‘केबीसी’ मायाजालाच्या सुत्रधारावर महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही गुन्हे appeared first on पुढारी.